पाडव्याला १५ हजार किलो श्रीखंड
By Admin | Updated: March 25, 2017 01:21 IST2017-03-25T01:21:40+5:302017-03-25T01:21:40+5:30
गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट आहे आणि यंदाच्या पाडव्याला ठाणेकर ते चक्क्याइतके घट्ट करतील, अशी स्थिती आहे.

पाडव्याला १५ हजार किलो श्रीखंड
ठाणे : गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट आहे आणि यंदाच्या पाडव्याला ठाणेकर ते चक्क्याइतके घट्ट करतील, अशी स्थिती आहे. यंदा आतापर्यंत नोंदवलेली मागणी पाहता जवळपास १२ हजार ते १५ हजार किलो श्रीखंड फस्त होईल, अशी स्थिती आहे.शिवाय घराघरात तयार होणाऱ्या मलईदार श्रीखंडासाठी साधारण सात हजार किलो चक्क्याची मागणी नोंदवली गेल्याचे विविध प्रथितयश विकेत्यांनी सांगितले.
दिवाळीला जशी फराळाच्या पदार्थांसोबत मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी होते, तसेच गुढीपाडव्याला श्रीखंडाच्या खरेदीला उधाण येते. या दिवशी ग्राहकांना वेगवेगळ्या चवींचे श्रीखंड उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांत चढाओढ लागते. एरव्ही दुकानात गेले की श्रीखंड, आम्रखंड हे दोन प्रकार उपलब्ध असतात. पूर्वी फक्त चारोळ््या घातलेले श्रीखंड मिळत असे. आता फळांपासून सुक्यामेव्यापर्यंत अनेक पदार्थांचा त्यात समावेश असतो. त्याचेही फ्यूजन केलेले असते. त्यामुळे श्रीखंड हा पदार्थही पारंपरिक उरलेला नाही.
पाडव्याशी जोडले गेलेले श्रीखंडाचे नाते पाहता, मागणीचा विचार करता त्यात भरपूर प्रयोग केलेले पाहायला, चाखायला मिळतात. केशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड (साधारण २८० रु. किलो), फ्रेशफ्रुट श्रीखंड, ड्रायफ्रुट श्रीखंड, स्ट्रॉबेरी, मिरची, रासबेरी, चिकू, संत्री, मोसंबी असे प्रकार पाडव्यानिमित्त चोखंदळ ग्राहकांची पसंती मिळवतात.
श्रीखंडात विविध प्रकार असले तरी केशरी श्रीखंड आणि आम्रखंडाला सर्वाधिक मागणी असते. पोटभर श्रीखंड खाणारे या दोन प्रकारांना पसंती देतात, तर इतर प्रकारांच्या श्रीखंडांची चवीपुरती खरेदी होत असल्याचे विक्रेते संजय पुराणिक
यांनी सांगितले. इतर प्रकारांचे श्रीखंड पाव किलो खरेदी केले जात असेल, तर केशरयुक्त आणि आम्रखंड यांची खरेदी किलो किलोत होते. ग्राहकांना चवीत बदल हवा असल्याचे मत टीप टॉपचे रोहितभाई शहा यांनीही मांडले.
रेडीमेड श्रीखंडाबरोबरच घरी श्रीखंड बनवण्यासाठी चक्का खरेदीची परंपराही कायम आहे. यंदा पाडव्यानिमित्त सात हजार किलो चक्क्याची खरेदी होणार आहे. पूर्वी चक्का खरेदी भरपूर प्रमाणात होत असे. पण आता वेळ नसल्याने थेट श्रीखंड खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. श्रीखंडाच्या खरेदीला आदल्या दिवशीपासून सुरूवात होते, ती थेट पाडव्याच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत म्हणजे पंगती बसेपर्यंत सुरू असते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. (प्रतिनिधी)