‘सुपारी घेऊन ओवेसींकडून हिंदू- मुस्लिमांत फूट’- मेहबूब शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:48 IST2020-12-26T23:48:00+5:302020-12-26T23:48:12+5:30
एनकेटी सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला.

‘सुपारी घेऊन ओवेसींकडून हिंदू- मुस्लिमांत फूट’- मेहबूब शेख
ठाणे : एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी हे नेहमीच आक्रमक आणि हिंसा भडकवणारी भाषणे करीत आहेत. मात्र, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येत नाहीत. भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये एमआयएमचे लोक हिंसक भाषणे करतात. त्यानंतर, दंगली भडकावल्या जात आहेत. म्हणजेच भाजपची सुपारी घेऊन ओवेसी जातीय दंगली भडकवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शनिवारी येथे केला.
एनकेटी सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर, राष्ट्रवादीचे युवक रोजगार सेलचे ओमकार माळी, नगरसेवक जितेंद्र पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी शेख म्हणाले की, देशात भाजपने हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये फूट पाडण्यासाठी एमआयएमच्या ओवेसी यांचा वापर सुरू केला आहे. निवडणुका आल्यावर हिंदू-मुस्लीम आणि लव्ह जिहाद असे प्रश्न निर्माण करून धार्मिक दंगली उसळविण्याचा भाजपचा अजेंडा ओवेसी सुपारी घेऊन चालवित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांना काय दिले, असे ते म्हणत आहेत, पण ७० वर्षांच्या एमआयएमने आतापर्यंत ओवेसी यांनाच खासदार केले आहे. मात्र, २१ वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक मुस्लिमांना राज्यसभेत संधी दिली. देशात सध्या फक्त शरद पवार हेच टक्कर देणारे नेते आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव यूपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेला आल्याचे ते म्हणाले.