आम्हाला घाबरूनच सोयीची प्रभाग रचना
By Admin | Updated: October 14, 2016 06:31 IST2016-10-14T06:31:15+5:302016-10-14T06:31:15+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे. हा परिसर नवे ठाणे म्हणून पुढे येत

आम्हाला घाबरूनच सोयीची प्रभाग रचना
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे. हा परिसर नवे ठाणे म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या परिसरात वाढलेल्या लोकसंख्येला विचारात घेऊन येथे नगरसेवकांची संख्या वाढवणे गरजेचे होते. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याने पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठीच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने या ठिकाणची मतदारांची संख्या वाढवून राष्ट्रवादीसोबत रडीचा डाव खेळल्याचा आरोप करून याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण पालिका प्रशासनाने ७ आॅक्टोबरला लॉटरी पद्धतीने जाहीर केले. प्रभागाची रचना करताना प्रशासनाने ५६ हजार लोकसंख्येची सीमारेषा ठरवली. या लोकसंख्येत १० टक्के कमी किंवा अधिक ही मुभाठेवली. त्याचा फटका नवे ठाणे म्हणून वाढणाऱ्या कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर येथे वाढलेल्या लोकसंख्येला बसणार आहे.
नव्या ठाण्याच्या प्रभागातील मतदारांच्या संख्येचा निकष १० टक्क्यांनी वाढून ती ६५ हजार झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अशा ठिकाणी प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या वाढवणे गरजेचे होते. परंतु, या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जास्त असल्याने सेना आणि भाजपाने प्रशासनाला हाताशी धरून जाणीवपूर्वक अशी चुकीची प्रभागरचना जाहीर केली आहे. नवे ठाणे म्हणून या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याप्रमाणात नगरसेवकांची संख्या वाढवायला होती. (प्रतिनिधी)