आरजी भूखंडातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला धार्मिक वळण देत विरोध; पोलिसांना धक्काबुक्की
By धीरज परब | Updated: December 20, 2024 22:40 IST2024-12-20T22:35:43+5:302024-12-20T22:40:35+5:30
Mira Road News: मीरारोडच्या शांती पार्क , गोकुळ व्हिलेज मधील रहिवाश्यांच्या हक्काच्या आरजी जागेत कम्युनिटी हॉलच्या आड झालेल्या धार्मिक स्थळां मधील बेकायदा बांधकामाचा भाग तोडण्याच्या कारवाई दरम्यान त्याला धार्मिक वळण देत जमावाने सरकारी कामात अडथळा आणला.

आरजी भूखंडातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला धार्मिक वळण देत विरोध; पोलिसांना धक्काबुक्की
मीरारोड - मीरारोडच्या शांती पार्क , गोकुळ व्हिलेज मधील रहिवाश्यांच्या हक्काच्या आरजी जागेत कम्युनिटी हॉलच्या आड झालेल्या धार्मिक स्थळां मधील बेकायदा बांधकामाचा भाग तोडण्याच्या कारवाई दरम्यान त्याला धार्मिक वळण देत जमावाने सरकारी कामात अडथळा आणला . तसेच पोलिसांना धक्काबुक्की करत महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना काठीने मारहाण केली . या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोकुळ व्हिलेज मध्ये मोठा आरजी भूखंड हा रहिवाश्यांचा हक्काचा असताना त्यात विविध अतिक्रमण आणि बांधकामे झाली आहेत . तर आरजी जागेत कम्युनिटी हॉल बांधता येत असला तरी ये ठिकाणी दोन संस्थांनी बांधकामे करून त्याचा हॉल भाड्याने देणे तसेच धार्मिक स्थळ म्हणून वापर चालवला आहे . रहिवाश्यांच्या हक्काचा आरजी भूखंड असताना त्यांनाच येथे येण्यास बंदी होती . त्यामुळे मुलांना खेळण्यास जागा नाही व रहिवाश्याना विरंगुळा , व्यायाम आदी पासून मुकावे लागले.
गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन ह्या रहिवाश्यांच्या संघटनेने या प्रकरणी महापालिके पासून शासना कडे सातत्याने तक्रारी करत आरजीचा भूखंड मोकळा करून द्यावा . अतिक्रमण हटवावे अशी मागणी चालवली होती . पालिकेने देखील पूर्वीच येथील बरेच बांधकाम वाढीव आणि अनधिकृत ठरवून देखील त्यावर कारवाई मात्र केली जात नव्हती . काही राजकीय मंडळी देखील कारवाई होऊ नये म्हणून दबाव टाकत होते.
मुंबई उच्च न्यायालयाने देखील रहिवाश्यांच्या याचिकेवर पालिकेला फटकारत कारवाईचे आदेश दिले होते . त्या नंतर विकासक व बेकायदा बांधकाम करणाऱ्या संस्था यांनी स्वतःहून वाढीव बांधकाम तोडणे सुरु केले होते . परंतु थोडेफार तोडून बाकी तोडण्यास टाळाटाळ सुरु झाली.
अखेर महापालिकेने शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बेकायदा बांधकाम तोडण्यास घेतले . कारवाईच्या वेळी काही संघटना व पक्षाच्या लोकांनी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली . कारवाईचा जेसीबी अडवण्यात आल्याने पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांशी धक्काबुक्की सुरु केली . त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली गेली.
पोलिसांनी जमावाला पिटाळून लावत काहींना ताब्यात घेतले . मीरारोड पोलीस ठाण्यात काही संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ९ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान पालिकेने एका हॉल - धार्मिक स्थळातील २ खोल्या , २ बाथरूम व १ जिना तोडला . तर दुसऱ्या हॉल - धार्मिक स्थळ येथील २ बाथरूम , १ खोली व १ जिना बेकायदा असल्याने पाडण्यात आला . तर काही अनधिकृत बांधकाम संबंधित विकासक व संस्था यांना काढून घेण्याचे पालिकेने सांगितले आहे.
आरजी जागा ह्या फ्लॅट विकत घेणाऱ्या रहिवाश्यांच्या हक्क व मालकीच्या असतात . मात्र संगनमताने रहिवाश्यांच्या जागा बळकावण्यात आल्याने हक्कासाठीचा हा लढा आहे . आरजी जागा रहिवाश्याना मिळवून देणे शासन - पालिकेचे कर्तव्य आहे असे रहिवाशी म्हणाले.
रहिवाश्यांच्या जागेत बळजबरी करून बेकायदा बांधकामाच्या संरक्षणा साठी त्याला धार्मिक स्थळे दाखवली गेली . कारवाई वरून त्याचा धार्मिक मुद्दा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या मालकी जागेत धार्मिक स्थळे उभारून द्यावीत असा सल्ला देखील येथील काही रहिवाश्यांनी विरोधकांना दिला आहे .