ऑपरेशन ऑल आऊट! ठाणे पोलिसांनी रातोरात केली १८४ आरोपींना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: November 24, 2022 20:53 IST2022-11-24T20:52:47+5:302022-11-24T20:53:11+5:30
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २४ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. २८५ अधिकारी आणि एक हजार ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

ऑपरेशन ऑल आऊट! ठाणे पोलिसांनी रातोरात केली १८४ आरोपींना अटक
ठाणे: ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंळामध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट या विशेष मोहीमेद्वारे तब्बल १८४ आरोपींची धरपकड केली. या मोहीमेमध्ये २८५ अधिकाऱ्यांसह एक हजार ३११ पोलीस अंमलदार सहभागी झाले आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २४ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सह पोलीस आयुक्त दतात्रय कराळे, अपर आयुक्त डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, वागळे इस्टेटचे उपायुक्त अमरसिंग जाधव, भिवंडीचे नवनाथ ढवळे यांच्यासह सर्व उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले. अचानक चार ते पाच तासांच्या या अभियानात १७७ गुन्हे दाखल झाले असून यात १८४ जणांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. यामध्ये अवैध शस्त्र बाळगणारे १२, तडीपार असूनही पुन्हा बेकायदेशीरपणे फिरणारे १६, बेकायदेशीर दारु विक्री करणारे ६८, जुगार खेळणारे नऊ, अंमली पदार्थांची विक्री करणारे ३५ तसेच वॉन्टेड दहा अशा १८४ जणार अटक केली.
अशी आहे वाहतूक पोलिसांनी कारवाई
याचदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक शाखेनेही २३ अधिकारी आणि ११८ पोलीस कर्मचारी यांच्या फौजफाटयाच्या मदतीने एक हजार ६५३ केसेस नोंदवून १० लाख ७ हजार २०० रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. यात तब्बल १० लाख८० हजार ५५० रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विना हेल्मेटच्या ५९५ चालकांकडून तीन लाख १७ हजारांचा दंड वसूल केला. तर विना सीट बेल्टच्या २३४ प्रवाशांकडून ५३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल झाला. त्याचबरोबर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ९१ चालकांवरही खटले भरण्यात आले.
त्यापाठोपाठ सिग्नल तोडणारे ४५, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या ३४ जणांवरही कारवाई करण्यात आली. ३०१ इतर कारवाईत एक लाख ८० हजार ५५० तर २२२ रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ७७ हजार २०० तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या ४२ चालकांकडून १ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या दंड वसूलीची कारवाई केली.