मेट्रो-चारचा मार्ग मोकळा; एमएमआरडीएला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 06:43 AM2019-12-21T06:43:47+5:302019-12-21T06:44:11+5:30

वृक्षांची कत्तल करण्यावरील स्थगिती उच्च न्यायालयाने हटविली

Open the way to the Metro-Four in thane | मेट्रो-चारचा मार्ग मोकळा; एमएमआरडीएला दिलासा

मेट्रो-चारचा मार्ग मोकळा; एमएमआरडीएला दिलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळा ते कासारवडवली (ठाणे) या मेट्रो - ४ प्रकल्पासाठी वृक्षांची कत्तल करण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने शुक्रवारी हटविली. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मोठा दिलासा मिळाला आहे.
न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला मेट्रो - ४ साठी ३६ झाडे कापण्यास परवानगी दिली.
तर मेट्रो कॉरिडॉरच्या दोन पॅचमध्ये ९१३ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे निर्देश दिले. पहिला पॅच ठाणे-मुलुंड चेक नाका ते माजिवडा जंक्शन आणि दुसरा पॅच घोडबंदर येथील मानपाडा ते डोंगरपाडा आहे.
उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने २३ आॅगस्ट २०१९ रोजी वृक्ष तोडीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती शुक्रवारी न्यायालयाने हटविली.
ठाणे-कळवा रस्ता रुंदीकरणासाठी ७७ झाडे तोडणार
न्यायालयाने ठाणे पालिकेला दिलासा दिला. १०१ झाडे तोडण्याची व ६६४ झाडांच्या पुनर्रोपणाची परवानगी दिली. त्यानुसार ठाणे-कळवा रुंदीकरणासाठी ७७ झाडे तोडण्यात येतील, उर्वरित २४ झाडे ठाणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी कापण्यात येतील.
मेट्रो -४ व अन्य १७ प्रकल्पांसाठी वृक्ष तोडण्यास प्राधिकरणाने दिलेली मंजुरी बेकायदा असल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी ठाणे नागरिक प्र्रतिष्ठान व रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. २३ आॅगस्ट रोजी प्राधिकरणाने १७ प्रकल्पांसाठी १,०६३ वृक्ष तोडण्यास परवानगी दिली; तर २,७७५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली.
यापूर्वी २५ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने वृक्षतोड करण्यास दिलेली स्थगिती हटविली होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम करत पुन्हा हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केले.
शुक्रवारच्या सुनावणीत पुन्हा उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर दिलेली स्थगिती उठविली. हा प्रकल्प जनहिताचा असल्याचे म्हणत न्यायालयाने ही स्थगिती हटविली.

Web Title: Open the way to the Metro-Four in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.