मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे केवळ आश्वासन, तीन वर्षे होऊन मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:17 AM2019-06-27T01:17:10+5:302019-06-27T01:17:39+5:30

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राची वास्तू बांधून तयार आहे. मात्र, तीन वर्षांपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याची तारीख विद्यापीठाकडून दिली जात आहे.

Only the assurance of the Kalyan Sub-center of Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे केवळ आश्वासन, तीन वर्षे होऊन मुहूर्त मिळेना

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे केवळ आश्वासन, तीन वर्षे होऊन मुहूर्त मिळेना

Next

कल्याण - मुंबई विद्यापीठाच्याकल्याण उपकेंद्राची वास्तू बांधून तयार आहे. मात्र, तीन वर्षांपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याची तारीख विद्यापीठाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात एकही डेडलाइन विद्यापीठाने पाळलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला दिलेली महापालिकेची जागा परत घेण्याचे हत्यार शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपसले आहे.
कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर व शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि रमेश जाधव हे विद्यापीठाला दिलेली जागा परत घेण्याचा ठराव येत्या महासभेत मांडणार आहेत. तसेच उपकेंद्र सुरू होत नसल्याने देवळेकर व जाधव हे याप्रकरणी युवासेनाप्रमुख ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा परिसरांतील विद्यार्थ्यांना सांताक्रूझ येथील कलिना विद्यापीठात जावे लागते. परंतु, हे अंतर लांब असल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे कल्याण येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, या उद्देशाने विद्यापीठाचे उपकेंद्र पश्चिमेतील वायलेनगरातील वसंत व्हॅली संकुलासमोर सुरू करण्यास मान्यता दिली गेली. महापालिकेने त्यासाठी १० एकरांचा भूखंड विद्यापीठाला मोफत दिला. विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या वास्तूचे भूमिपूजन २०१० मध्ये तत्कालीन उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. मात्र, उपकेंद्राच्या इमारतीचे काम २०१६ अखेरीस पूर्णत्वास आले. विद्यापीठाने त्यावर जवळपास २० कोटी रुपये खर्च केले आहेत. आणखी २० कोटींचे काम प्रस्तावित आहे. कंत्राटदाराला विद्यापीठाकडून बिल दिले जात नसल्याने काही कामे रखडली होती. तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर तसेच त्यानंतर डॉ. संजय देशमुख यांनीही हे उपकेंद्र लवकरच सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळात पेपरतपासणी व विलंबाने लागलेला निकाल, यामुळे त्यांची कुलगुरूपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्याचकाळात एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे उपकेंद्र सुरू केले जाणार नसेल, तर महापालिकेने विद्यापीठाला दिलेला भूखंड परत घ्यावा, असा इशारा दिला होता. त्यानंतर, पुन्हा हालचाली सुरू झाल्या. त्यालाही ब्रेक लागल्यावर शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील वायले यांनी जागा परत घेण्यासाठी पत्रव्यवहार केला.
नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी जून २०१८ मध्ये त्याची दखल घेत केडीएमसीचे आयुक्त व महापौरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्ही हे उपकेंद्र तीन महिन्यांत सुरू करू, असे आश्वासन दिले होेते. मात्र, तेही हवेत विरले आहे. २०१९ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी येथे अद्याप पदव्युत्तर विभाग सुरू झालेला नाही.

स्कूल आॅफ इंजिनीअरिंगसाठी हवा निधी

कल्याणचे विद्यापीठ उपकेंद्र हे परदेशातील स्कूल आॅफ इंजिनीअरिंगच्या धर्तीवर सुरू करायचे आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे मत विद्यापीठाचे डॉ. प्रशांत उकरांडे यांनी डोंबिवलीत डिसेंबरमध्ये झालेल्या एका परिसंवादप्रसंगी व्यक्त केले होते. यावेळी माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्रही उपस्थित होते.

ठाण्यातील उपकेंद्रात स्कूल आॅफ इंजिनीअरिंग सुरू करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निधी देण्यास अनुकूलता दर्शवली होती. त्याच धर्तीवर केडीएमसी आयुक्त व महापौरांनी निधी देण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली होती.

इंजिनीअरिंग विभागाचा ना-हरकत दाखला मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय कल्याणचे उपकेंद्र सुरू करता येत नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: Only the assurance of the Kalyan Sub-center of Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.