तुंगारेश्वर धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू, नालासोपाऱ्यात एक वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 20:37 IST2017-08-30T20:36:49+5:302017-08-30T20:37:10+5:30
तुंगारेश्वर धबधब्यात बुडून कांदिवली येथील आनंद वैती (22) याचा बुडून मृत्यू झाला. प्रवाहात वाहून जात असलेल्या तरुणीला वाचवताना आनंद स्वतः वाहून गेला होता.

तुंगारेश्वर धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू, नालासोपाऱ्यात एक वाहून गेला
वसई, दि. 30 - तुंगारेश्वर धबधब्यात बुडून कांदिवली येथील आनंद वैती (22) याचा बुडून मृत्यू झाला. प्रवाहात वाहून जात असलेल्या तरुणीला वाचवताना आनंद स्वतः वाहून गेला होता. त्याचा मृतदेह बुधवार संध्याकाळी हाती लागला.
कांदिवली येथे राहणारा आनंद आपल्या मित्रांसोबत तुंगारेश्वर येथे आला होता. पाऊस असल्याने धबधब्यात पाण्याचा प्रवाह जोरात होता. धबधब्यात अडकलेल्या तरुणीला काढत असताना पाय घसरून आनंद पडला आणि प्रवाहात वाहून गेला, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
तरुणीचा जीव वाचवणाऱ्या आनंदचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी हाती लागला. तुंगारेश्वर धबधब्यात बुडून गेल्या दोन महिन्यात आठ जणांचे प्राण गेले आहेत. आनंद तलवारबाजीत तरबेज होता. त्याने तलवारबाजीत अनेक पदके जिकली आहेत.
दरम्यान, बुधवारी दुपारी नालासोपारा येथील रेल्वेलगत असलेल्या नाल्यात एक अनोळखी इसम वाहून गेला. या परिसरातील लोकानी माहिती दिल्यानंतर तुळींज पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली होती. रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.