वीज पडून भाईंदरला एकाचा मृत्यू, तर शहापूरचे २५ जखमीं उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 18:38 IST2020-10-22T18:37:35+5:302020-10-22T18:38:32+5:30
Thane : पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत ही उत्तम सुधारणा आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राजेंद्र तवटे यांनी सांगितले.

वीज पडून भाईंदरला एकाचा मृत्यू, तर शहापूरचे २५ जखमीं उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल
ठाणे : अवकाळी पावसादरम्यान वीज पडून भाईंदर परिसरातील पाली येथील एकाचा मृत्यू झाला आहे. तर याच कालावधीत शहापूर तालुक्यातील शिरोळ गावांजवळील फणसपाडा येथील घरावर वीज पडून तब्बल २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्रांनंतर शहापूर उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत ही उत्तम सुधारणा आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राजेंद्र तवटे यांनी सांगितले.
उत्तनच्या पातान बंदराच्या समुद्र किनारी उभा असलेल्या सुप्रिनो सचिन भंडारी हा 14 वर्षीय युवकाच्या अंगावर बुधवारी संध्याकाळी वीज पडून तो खाली पडला. दरम्यान त्यास मिरा रोडच्या नयानगर येथील आँकार्ड रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या अहवालावरुन उघड करण्यात आले आहे.
याच दरम्यान शहापूर तालुक्यातील शिरोळ येथील फणसपाडा (उंबरमाळी) येथील भिका थोराड यांच्या घरावर संध्याकाळी वीज पडली असता त्यांच्या घरातील न ऊ जणांसह शेजारील घरांमधील १६ आदी २५ जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. या दुर्घटनेत थोराड यांच्या राहत्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, असे तवटे यांनी स्पष्ट केले आहे.