ओमी टीम शनिवारी भाजपात

By Admin | Updated: January 26, 2017 03:16 IST2017-01-26T03:16:45+5:302017-01-26T03:16:45+5:30

अखेर... ओमी कलानी टीमच्या भाजपा प्रवेशाला मुहूर्त सापडला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी

Omi Team on Saturday | ओमी टीम शनिवारी भाजपात

ओमी टीम शनिवारी भाजपात

सदानंद नाईक / उल्हासनगर
अखेर... ओमी कलानी टीमच्या भाजपा प्रवेशाला मुहूर्त सापडला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी, २८ जानेवारीला त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश होईल. हा प्रवेशाचा सोहळा जंगी व्हावा यासाठी गोलमैदान राखून ठेवण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. त्याचवेळी ओमी टीमने रिपाइं आठवले गटाच्या जागांवर दावा सांगितल्याने त्या पक्षाने बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या प्रवेशाची बातमी ‘लोकमत’ने फोडली होती.
गेले तीन महिने उल्हासनगरचे राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या ओमी कलानी यांचा भाजपा प्रवेशाचा निर्णय होत नसल्याने शिवसेना-भाजापा युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपासून सर्व राजकीय चर्चा खोळंबल्या होत्या. हो-ना करता करता भाजपाने अखेर ओमी टीमच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला.
आयलानी, जिल्हा महासचिव प्रदीप रामचंदानी यांच्यासह ओमी टीमच्या सदस्यांनी २८ जानेवारीच्या प्प्रवेश सोहळ््याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ओमी-भाजापाचे ९० टक्के जागावाटप पूर्ण झाले असून विद्यमान नगरसेवक कायम ठेवत उरलेल्या जागा निम्म्या-निम्म्या वाटून घेण्यावर एकमत झाल्याची माहिती त्यांनी दिली. काही जागांवरून भाजपा आणि ओमी टीममध्ये वाद होऊन तू तू मैं मैं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हे एकत्र येणे दोन्ही पक्षांनाही पचवून घेणे कठीण जात असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Omi Team on Saturday