रहिवाशांच्या रोषामुळे अधिकाऱ्यांची माघार; दिव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करता पथक फिरले माघारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:01 IST2025-02-25T08:01:08+5:302025-02-25T08:01:20+5:30
दिव्यातील आनंद पार्क या १८ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीवर सोमवारी ठाणे पालिका अतिक्रमणविरोधी पथकांकडून कारवाई करण्यात येणार होती.

रहिवाशांच्या रोषामुळे अधिकाऱ्यांची माघार; दिव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करता पथक फिरले माघारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : दिव्यातील स्थानिक रहिवाशांच्या रोषामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करता ठाणे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाला माघारी परतावे लागले. कारवाईला विरोध करताना रहिवाशांनी आक्रमक होऊन प्रथम इमारतीच्या परिसरात आणि नंतर दिवा-दातिवली रस्त्यावर उतरून सोमवारी आंदोलन केले. प्रशासनाने कारवाई केल्यास अंगावर पेट्रोल टाकून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.
दिव्यातील आनंद पार्क या १८ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीवर सोमवारी ठाणे पालिका अतिक्रमणविरोधी पथकांकडून कारवाई करण्यात येणार होती. तसे नियोजन प्रशासनाने केले होते. कारवाईची माहिती मिळाल्यामुळे इमारतीमधील तब्बल १५० कुटुंबांतील सदस्य शनिवारपासून आंदोलन करत आहेत.
कारवाई होणाऱ्या इमारतीजवळ उपायुक्त मनीष जोशी, पालिका अधिकारी तसेच कर्मचारी पोलिस फौजफाट्यासह पोहोचताच रहिवासी आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती.
ठाणे महापालिका अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करते. त्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतीवर कारवाई करण्यात येणार आहे. इमारतीमधील काही दुकानांवर कारवाई करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मनीष जोशी,
उपायुक्त, ठाणे महापालिका.
हातात पेट्रोलच्या बाटल्या
रहिवाशांच्या हातात यावेळी पेट्रोलच्या बाटल्या होत्या. त्यांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.
कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी आक्रमक झालेल्या रहिवाशांना समर्थन देण्यासाठी माजी उपमहापौर रमाकांत मढवी, शिंदेसेनेचे पदाधिकारी आदेश भगत, उद्धवसेनेचे पदाधिकारी रोहिदास मुंडे, मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते.
मढवी यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी जोशी यांचे मोबाईलवर बोलणे करून दिल्यानंतर कारवाई न करता परतण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिव्यातील कारवाई तूर्तास थांबवा : गणेश नाईक
ठाणे : दिवा भागातील ५४ बेकायदा इमारतींवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले असून ठाणे पालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने ठाण्यातील जनता दरबारात नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यावर या इमारतींबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा, असे आदेश त्यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
डोंबिवलीच्या ६५ इमारतींबाबत आज मंत्रिमंडळात निर्णय
जनता दरबारात उद्धव सेनेचे दीपेश म्हात्रे यांच्यासह डोंबिवलीतील नागरिकांनी नाईक यांची भेट घेऊन कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा इमारतीतील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली.
या इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून नागरिकांना कसा न्याय देता येईल याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.