वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी!
By सुरेश लोखंडे | Updated: January 16, 2025 19:55 IST2025-01-16T18:48:24+5:302025-01-16T19:55:21+5:30
Thane News: वर्षभर फाईलींचा निपटारा करण्यात आघाडीवर असलेल्या या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डाेंबिवलीजवळील पलावा सिटीच्या मैदानावर आपल्यातील खेळाडू जागा करून मैदान मारण्यासाठी आगेकुच करून नयनरम्य खेळाच्या स्पर्धां जिंकल्या.

वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी!
- सुरेश लोखंडे
ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दाेन दिवशीय क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. वर्षभर फाईलींचा निपटारा करण्यात आघाडीवर असलेल्या या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डाेंबिवलीजवळील पलावा सिटीच्या मैदानावर आपल्यातील खेळाडू जागा करून मैदान मारण्यासाठी आगेकुच करून नयनरम्य खेळाच्या स्पर्धां जिंकल्या. तर शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रम डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार आहे.
सध्याच्या गुलाबी थंडीत रंगलेल्या या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व सुप्रसिध्द टेबल टेनिसपटू शिवप्रिया यांच्या हस्ते मशाल पेटवून जल्लाेषात उद्घाटन करण्यात आले. उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मैदानात उतरलेल्या खेळाडू अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घुगे यांनी स्वागत केले. यावेळी तब्बल १८ विविध मैदानी खेळांचा समावेश आढळून आला. तर इनडोअर गेमचे (बैठे खेळ) नियोजन उत्तमरित्या केल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचे घुगे यांनी कौतुक करीत मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे असल्याची दाद ही त्यांनी यावेळी दिली. प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास अधिकारी संजय बागुल, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर आदींसह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या खेळाडू जागा करून स्पर्धा जिंकल्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले.
या खेळांव्दारे अधिकाऱ्यांमधील खेळाडू दिसून आला
अधिकाऱ्यांच्या या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात कबड्डी, खोखो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सी खेच या सांघिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या. तर वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुषांसाठी १०० मिटर धावणे, गोळा फेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्कवॅश, कॅरम, बुध्दीबळ, संगीत खुर्ची, जलतरण अशा विविध खेळांव्दारे आपल्यातील खेळाडून मैदानामध्ये उभा करून स्पर्धां जिंकल्या आहेत.