‘कोकणकन्ये’तील महिलेची ‘वनरुपी’मध्ये प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:39 IST2019-04-28T00:39:12+5:302019-04-28T00:39:38+5:30
ठाणे स्थानकातील घटना, उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात केले दाखल; बाळ-बाळंतीण सुखरूप

‘कोकणकन्ये’तील महिलेची ‘वनरुपी’मध्ये प्रसूती
ठाणे : कणकवलीहून कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या पूजा मुन्ना चौहान (२०) या महिलेला कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शौचालयातच प्रसववेदना होऊ लागल्याने सुदैवाने गाडी ठाणेरेल्वेस्थानकात लागल्यावर येथील प्रथमोपचार केंद्रामधील (वनरुपी क्लिनिक) डॉक्टर ओमकार आणि पारिचारिका पूजा यांनी रेल्वे प्रशासनाच्या मदतीने तातडीने क्लिनिकमधून आणून शनिवारी सकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास तिची सुखरूप प्रसूती केली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला असून बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासन आणि तेथील डॉक्टरांनी सांगितले.
चौहान दाम्पत्य हे दोन मुलांसह शुक्रवारी कणकवलीहून मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथे निघाले होते. त्यासाठी ते कोकणकन्या एक्स्प्रेसमधून ठाण्यात उतरून त्यानंतर ठाण्यातून बुऱ्हाणपुरला जाणाºया गाडीने प्रवास करणार होते. दरम्यान, सकाळीच ठाणे रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच तिला प्रसववेदना सुरू झाल्या. यावेळी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाºया सहप्रवाशांनी याबाबत रेल्वे कंट्रोलला माहिती दिली. रेल्वे कंट्रोलकडून ठाणे रेल्वेस्थानक प्रबंधक कार्यालयाला कळवले. माहिती मिळताच ठाणे रेल्वे उपस्टेशन प्रबंधक पी.के. प्रधान यांनी क्लिनिकमधील डॉक्टरांना माहिती देऊन तेथील स्टाफ घेऊन गाडी येणाºया फलाटाकडे धाव घेतली. गाडी स्थानकात लागताच या महिलेची तपासणी केली असता प्रसूतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यामुळे तिला तातडीने स्ट्रेचरवरून क्लिनिकमध्ये आणून तिची त्यानंतर डॉक्टरांनी सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर, पुढील उपचारार्थ त्या मायलेकीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवल्याची माहिती रेल्वे आणि डॉक्टरांनी दिली.
अशा प्रकारे या प्रथमोपचार केंद्रातील एप्रिल या महिन्यातील दुसरी, तर प्रथमोपचार सुरू झाल्यानंतरची चौथी आणि मुंबईमधील सातवी नॉर्मल प्रसूती असल्याची माहिती क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.