हे प्रसूतिगृह की कोंडवाडा? २५ बेड अन् ३२ गर्भवती भरती; ६० टक्के महिला सिझेरियन झालेल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:11 IST2025-10-26T06:10:30+5:302025-10-26T06:11:58+5:30
कळवा रुग्णालयात प्रसूतीआधीच सोसाव्या लागताहेत अव्यवस्थेच्या कळा

हे प्रसूतिगृह की कोंडवाडा? २५ बेड अन् ३२ गर्भवती भरती; ६० टक्के महिला सिझेरियन झालेल्या
अजित मांडके
ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतिगृहात अक्षरशः कोंडवाड्यासारखी परिस्थिती आहे. प्रसूतिगृहात २५ खाटांची सुविधा असताना, ३२ महिला दाखल आहेत. त्यामुळे काही महिलांवर थंडगार फरशीवर झोपण्याची वेळ आली असून आणखी आठ महिला प्रसूतीसाठी खाटांच्या प्रतीक्षेत आहेत. तर अनेक महिलांना जागेअभावी ठाणे जिल्हा रुग्णालय किंवा मुंबईतील केईएम रुग्णालयात पाठविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
गर्भवतींना प्रसूतीकळा होण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाच्या अव्यवस्थेच्या कळा सोसाव्या लागत आहेत. अलीकडेच ठाण्यातील गर्भवतीच्या कुटुंबाला अशाच भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या महिलेला डिसुझावाडी आरोग्य केंद्रातून कळवा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर बेड फुल असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी सोनोग्राफी करून येण्यास सांगितले. परत आल्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यादरम्यान गर्भवतीसह कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला.
६० टक्के महिला सिझेरियन झालेल्या
कळवा रुग्णालयात दाखल झालेल्या महिला या ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी आणि अगदी वसई, विरार, पालघरपासून आल्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
ज्या अतिरिक्त महिला दाखल आहेत, त्यांच्यासाठी अतिरिक्त बेडची व्यवस्था केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.
६०% महिलांचे सिझेरियन करण्यात आले आहे, तर उर्वरित ४० टक्के महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. सर्व माता आणि बाळांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले.
महिला वॉर्डसुद्धा फुल्ल
कळवा रुग्णालयात महिलांचा विशेष वॉर्ड आहे. याठिकाणी ७२ बेड आहेत, मात्र तो सुद्धा फुल्ल असल्याची माहिती आहे. या विभागात दाखल असलेल्या ज्या महिलांना बरं वाटत आहे, त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले.
५०० बेड वाढवण्याचे नियोजन
कळवा रुग्णालय ५०० बेडचे आहे. त्या ठिकाणी ५०४ रुग्ण उपचार घेत आहेत. याठिकाणी ओपीडीत दररोज १८०० ते २२०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. ६५ कोटी खर्च करून येथील विभागांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. तसेच भविष्यात येथील बेडची क्षमता आणखी ५०० ने वाढविण्याचे नियोजन आहे.
कळवा रुग्णालय ५०० बेडचे आहे. त्या ठिकाणी ५०४ रुग्ण उपचार घेत आहेत. याठिकाणी ओपीडीत दररोज १८०० ते २२०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. ६५ कोटी खर्च करून येथील विभागांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. तसेच भविष्यात येथील बेडची क्षमता आणखी ५०० ने वाढविण्याचे नियोजन आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात व सिव्हिल रुग्णालयात जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड, भिवंडी, टिटवाळा वगैरे भागांतून व मुख्यत्वे ग्रामीण भागातून महिला, पुरुष उपचाराकरिता येतात.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतिगृहात २५ खाटांची क्षमता आहे. सध्या ३२ गर्भवती दाखल असून, विभाग फुल झाल्याने महिलांची प्रकृती स्थिर करून त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा मुंबईतील केईएम रुग्णालयात पाठविले जात आहे- अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा.