रेल्वे अपघातांच्या संख्येत घट होऊनही मृतांची संख्या २० ने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:57 IST2020-02-11T23:57:08+5:302020-02-11T23:57:11+5:30
पाच वर्षांत २५३८ अपघात : १२२२ जणांचा मृत्यू, जखमींची संख्या झाली कमी

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट होऊनही मृतांची संख्या २० ने वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत दोन हजार ५३८ रेल्वे अपघात झाले. यामध्ये एक हजार १२२ जणांचा बळी गेला असून एक हजार ४१६ जण जखमी झाले आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघातांची संख्या २९ ने घटली असली तरी मृतांची संख्या मात्र २० ने वाढली आहे. जखमींची संख्याही ४९ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरी ते दिवा आणि दिवा ते निळजे अशी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द पसरली आहे. ही हद्द पूर्णपणे कुठेही बंदीस्त नसल्याने रेल्वे रूळाशी नागरिकांचा संपर्क येताना दिसतो. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे असो वा कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वेस्थानकांवर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. ठाण्यातून रेल्वेने दररोज ८-९ लाख प्रवासी येजा करतात. सकाळी आणि सायंकाळी लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी अक्षरश: लटकून येजा करतात. यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना होणाºया अपघातांमध्ये मध्यंतरी वाढ झाली होती.
जीआरपी आणि आरपीएफची जनजागृती
च्अपघात रोखण्यासाठी ठाणे जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरीत्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवून जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याचबरोबर रेल्वेस्थानकातील शॉर्टकट बंद करण्यावरही
भर दिला.
च्२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण कमी झाले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवणेही जोखमीचे काम असते. त्यांना बेवारस न ठेवता त्यांची ओळख पुढे आणण्याचे काम प्रामुख्याने केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मृतांची संख्या २० ने वाढली
२०१८ मध्ये अपघातांमध्ये २०३ जणांचा बळी गेला होता. यातील ११४ जणांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली होती. २०१९ मध्ये ही संख्या २० ने वाढल्याने बळींची संख्या २२३ वर पोहोचली. मात्र, बेवारस मृतांची संख्या कमी होऊन ती संख्या ७० वर आली आहे. २०१८ मध्ये जखमींची संख्या ३१९ होती, २०१९ मध्ये ती ४९ ने कमी झाल्याची सूत्रांनी दिली.
चिठ्ठीवरून बेवारसाची ओळख
मध्यंतरी निळजे येथे झालेल्या एका अपघातात डोंबिवली येथे राहणारा अजयकुमार शर्मा (२८) याचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीवरून तो मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे पुढे आले होते. चिठ्ठीवरील एका फोन नंबरवरून त्याची ओळख समोर आली.