आता वॉर रुममधून शहर सौंदर्यीकरणासह खड्डेमुक्त आणि स्वच्छतेचाही आयुक्त घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 17:42 IST2022-12-26T17:41:03+5:302022-12-26T17:42:01+5:30
शहरातील या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेण्यासाठी वॉर रुम तयार केली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

आता वॉर रुममधून शहर सौंदर्यीकरणासह खड्डेमुक्त आणि स्वच्छतेचाही आयुक्त घेणार आढावा
ठाणे : 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानांतर्गत खड्डेमुक्त शहर, स्वच्छता, सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी महत्वाकांक्षी कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी आहे. या कालावधीमध्ये ही कामे पूर्ण करुन नागरिकांना शहरात दृश्यस्वरुपात होणारा बदल घडविणे आव्हानात्मक आहे. शहरातील या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेण्यासाठी वॉर रुम तयार केली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
ठाणे शहरात खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालयाची सफाई यासह विविध नागरी कामे युद्धपातळीवर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या महत्वाकांक्षी चारही कामांचा आढावा वॉर रुमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. या कामांची छोट्या बाबींमध्ये विभागणी केली जाणार आहे. त्यांची कालमर्यादाही निश्चित असल्याने वार रुमच्या माध्यमातून दैनंदिन कामांचा प्रगती अहवाल पाहिला जाणार आहे. एका बाजूला प्रकल्प अंमलबजावणीची गती, कामाचा दर्जा याची अद्ययावत माहिती उपलब्ध होईलच, त्याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करुन त्याबाबत कामाच्या धोरणात सुधारणा करणे शक्य होणार असल्याचेही बांगर यांनी म्हटले आहे.
खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि शौचालयाची सफाई या चारही कामांसाठी प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. संबंधित अधिकाऱ्यामार्फत कामांचा दैनंदिन प्रगती अहवाल दिला जाईल. हा अहवाल वॉर रुमच्या माध्यमातून आयुक्तांना केव्हाही पाहणे शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.