टीएमटी कार्यशाळेत आता रात्रीही दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:54 IST2018-07-21T23:54:12+5:302018-07-21T23:54:46+5:30
ठाणे परिवहनसेवेबाबत लेखापरीक्षण अहवालात आक्षेप आल्यानंतर आता परिवहन प्रशासन खडबडून जागे झाले आहे

टीएमटी कार्यशाळेत आता रात्रीही दुरुस्ती
ठाणे : ठाणे परिवहनसेवेबाबत लेखापरीक्षण अहवालात आक्षेप आल्यानंतर आता परिवहन प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रात्रीचा दिवस करून नादुरुस्त बस रस्त्यावर जास्तीचजास्त कशा काढता येतील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. बसदुरुस्तीसाठी आता रात्रीची शिफ्टही सुरू केली आहे. यामुळेच शनिवारी कळवा आणि वागळे आगारांतून दुप्पट बस रस्त्यावर धावल्या.
ठाणे परिवहनसेवेचा २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवाल नुकताच सादर झाला. यामध्ये तब्बल ४३ आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांच्या अनुषंगाने सदस्यांनी परिवहनच्या बस रस्त्यावर अगदी कमी प्रमाणात धावत असल्याची जोरदार टीका केली होती. जीसीसी कॉन्ट्रक्टच्या अधिक बस धावत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यामुळे परिवहनमधील कर्मचारीसुद्धा बसून असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे अखेर व्यवस्थापक संदीप माळवी यांनी या सर्वांची दखल घेऊन परिवहनसेवा सुधारण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. उत्पन्न आणि खर्च यामधील ताळमेळ बसवण्यासाठी प्रयत्न सुरूअसतानाच जास्तीतजास्त बस रस्त्यावर कशा उतरवता येतील, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
यापूर्वी बसदुरुस्ती केवळ सायंकाळपर्यंतच केली जात होती. त्यामुळे सायंकाळनंतर येणाऱ्या नादुरुस्त बस सकाळपर्यंत दुरुस्तीसाठी डेपोत पडून असायच्या. त्यामुळे सकाळी कार्यशाळेतील कर्मचारी आल्यानंतर दुपारपर्यंत त्या दुरुस्त होऊन रस्त्यावर उतरवल्या जात होत्या. त्यामुळे रस्त्यावर बस धावण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, आता रात्रीची शिफ्ट कळवा आणि वागळे आगारांमध्ये सुरू केल्याची माहिती व्यवस्थापक माळवी यांनी दिली.
शनिवारी आल्या ९४ बस रस्त्यावर
सायंकाळी येणाºया बस सकाळपर्यंत दुरुस्त होऊन रस्त्यावर धावत आहेत. यामुळे शनिवारी वागळे आगारातून ६९ आणि कळवा आगारातून २५ बस धावल्याची माहिती माळवी यांनी दिली. अजूनही इतर प्रकारचे बदल करण्याचे प्रस्तावित असून येत्या काळात यापेक्षाही अधिकच्या बस रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.