ठाणे मनपाच्या १२४ इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:17+5:302021-05-27T04:42:17+5:30
ठाणे : ठाणे मनपाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इमारत दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई सुरू केली ...

ठाणे मनपाच्या १२४ इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा
ठाणे : ठाणे मनपाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इमारत दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई सुरू केली आहे. तर, दुसरीकडे शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या १२४ इमारतींना तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे फर्मान मनपाने काढले आहे. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी धावपळ सुरू झाली आहे. मनपाच्या पॅनलवरील ऑडिटरकडून हे ऑडिट करता येऊ शकते, असे आवाहन करताना मनपाने त्यांची यादीही जाहीर केली आहे.
ठामपाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार यंदा चार हजार ५५६ इमारती धोकादायक आहेत. त्यातील ७३ इमारती या अतिधोकादायक असून, त्या इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाईचे आदेश मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ३० इमारतींवर कारवाई केल्याची माहिती मनपाने दिली आहे. परंतु, आता शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतींनाही मनपाने नोटिसा बजावत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांनी तत्काळ ऑडिट करून घ्यावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मनपाने दिल्या आहेत. ३० वर्षे इमारती राहण्यासाठी योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी मनपाने अशाप्रकारचे आदेश दिले आहेत.
ठाणे मनपाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्यांकडून इमारतींचे ऑडिट करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या अभियंत्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पालिकेला सादर करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इमारतींना २५ हजार रुपये किंवा वार्षिक मालमत्ताकर यापैकी जी जास्त रक्कम असेल, तितका दंड आकारण्याची अधिनियमात तरतूद असल्याचे प्रशासनाने नोटिशीत नमूद केले आहे. त्यामुळे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार आली आहे.
-----------------