शहरातील रुग्णालयांना पुन्हा नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 12:10 AM2021-05-08T00:10:12+5:302021-05-08T00:10:21+5:30

३४७ रुग्णालयांना अग्निसुरक्षेच्या नियमांबाबत पालिकेने बजावले

Notice to hospitals in the city again | शहरातील रुग्णालयांना पुन्हा नोटिसा

शहरातील रुग्णालयांना पुन्हा नोटिसा

googlenewsNext

ठाणे  :  मुंब्य्रातील प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर जाग आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ३४७ रुग्णांलयांना पुन्हा नोटिसा बजावून अग्निसुरक्षा सक्षम करण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांपैकी ३४ रुग्णालये बंद असून २८२ रुग्णालयांना हा अहवाल आता सादर करावा लागणार आहे. यापूर्वी ठाण्यातील ६५ रुग्णालयांमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे त्यांनादेखील पुढील सात दिवसांची मुदत दिल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. त्यानंतर कशाप्रकारे कारवाई करता येऊ शकते, याचा अभ्यासदेखील अग्निशमन विभागाने सुरू केला आहे.           

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंब्य्रातील प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीतून बाहेर काढल्यानंतर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासणीअंती या रुग्णालयाकडे अग्निशमन दलाचा ना हरकत दाखलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आता शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे शहरात सरकारी तसेच पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास असून ३४७ खासगी रुग्णालये आहेत. 
मुंब्रा घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता हे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. याआधी केलेल्या अशाच प्रकारच्या तपाणीत ठाण्यातील २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्याचे समोर आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असून ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. 

कारवाई विचाराधीन 
नियम धाब्यावर बसवलेल्या ६५ रुग्णालयांना नोटिसा बजावून सात दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने याआधीही दिले होते. मात्र, त्याकडे या रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. मुदतीनंतरही यंत्रणा बसविण्याकडे कानाडोळा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर काय कारवाई करता येऊ शकते, याचा विचार पालिकेत सुरू आहे.

Web Title: Notice to hospitals in the city again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.