ना विकास, हरित क्षेत्रात ७,३७२ बांधकामे, ठाणे महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात आले उघडकीस, आणखी ९०० इमारतींवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:04 IST2025-08-26T09:04:28+5:302025-08-26T09:04:54+5:30
Thane News: ठाण्यातील हरित व ना विकास क्षेत्रात तब्बल सात हजार ३७२ अनधिकृत बांधकामे उभी राहिली असल्याचे धक्कादायक वास्तव ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने शीळ परिसरातील २१ इमारतींवर सर्वप्रथम कारवाई केली होती. आता आणखी ९००च्या आसपास इमारतींवर कारवाई होणार आहे.

ना विकास, हरित क्षेत्रात ७,३७२ बांधकामे, ठाणे महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात आले उघडकीस, आणखी ९०० इमारतींवर होणार कारवाई
ठाणे - ठाण्यातील हरित व ना विकास क्षेत्रात तब्बल सात हजार ३७२ अनधिकृत बांधकामे उभी राहिली असल्याचे धक्कादायक वास्तव ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने शीळ परिसरातील २१ इमारतींवर सर्वप्रथम कारवाई केली होती. आता आणखी ९००च्या आसपास इमारतींवर कारवाई होणार आहे.
हरित व ना विकास क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका आता या एवढ्या बांधकामांवर कशी कारवाई करणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. सर्वाधिक चार हजार ३६५ बांधकामे एकट्या कळवा भागात आहेत. वागळे आणि लोकमान्य नगर भागातील हरित क्षेत्रात एकही अनधिकृत बांधकाम झालेले नाही. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हरित आणि ना विकास क्षेत्रात तब्बल सात हजार ३७२ अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
उच्च न्यायालयाचे आदेश
ठाण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने कारवाईची माेहीम हाती घेतली असून, अनेक बांधकामे जमीनदाेस्त हाेणार आहेत.
संरक्षण देण्याचा विचार सुरू
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात हरित आणि ना विकास क्षेत्रात झालेली ही बांधकामे आजची नसून ती तब्बल ३० ते ४० वर्षांपूर्वी झालेली असल्याची माहिती उघड झाली. काही बांधकामे १० ते २० वर्षांपूर्वीची असल्याची माहिती आहे.
त्या बांधकामांमध्ये मागील कित्येक वर्षे हजारो कुटुंबे वास्तव्यास असल्यामुळे त्यावर कारवाई करता येईल का? याचा विचार सुरू आहे. शिवाय या बांधकामांना संरक्षण देण्याचा विचारही सुरू झाला आहे; परंतु ते कसे करता येऊ शकते याची तपासणी केली जात आहे.
लोकमान्य नगरात एकही नाही
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक चार हजार ३६५ अनधिकृत बांधकामे ही कळवा भागात आहेत. त्या खालोखाल दिव्यात एक हजार ८२८ बांधकामे आहेत. वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर भागात एकही अनधिकृत बांधकाम हरित किंवा ना विकास क्षेत्रात झाल्याचे आढळून आले नाही.