स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले कालवश
By Admin | Updated: February 1, 2017 02:45 IST2017-02-01T02:45:16+5:302017-02-01T02:45:16+5:30
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पद्मविभूषण, टेम्पलटन आणि रॅमन मेगसेसे पुरस्कार विजेते, कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले

स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले कालवश
ठाणे : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पद्मविभूषण, टेम्पलटन आणि रॅमन मेगसेसे पुरस्कार विजेते, कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले (९०) यांचे सोमवारी सायंकाळी ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी निधन झाले. बुधवारी दुपारी ४ वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
निर्मलातार्इंचा जन्म ३ आॅगस्ट १९२६ रोजी गावखडी, जि. रत्नागिरी येथील सिधये कुटुंबात झाला. १९४४ साली पांडुरंगशास्त्रींशी विवाह झाला होता. निर्मलातार्इंनी केवळ दादांचा संसारच नव्हे, तर त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही त्यांनी भक्कम साथ दिली. लाखो स्वाध्यायींची माऊली असूनही त्यांनी कधीही स्वत:चे व्यक्तिमत्त्व पुढे न करता, दादांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वामध्ये विरघळून जाणेच पसंत केले.
स्वाध्याय कार्यातील बंधू-भगिनींना, तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या देहावसनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्यास होत्या.
तार्इंच्या जाण्याने स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठात ठेवण्यात आले आहे. बुधवारी दुपारपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दुपारी ४ वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी)