येत्या रविवारचे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही! दा.कृ.सोमण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:17 IST2025-09-18T20:14:53+5:302025-09-18T20:17:17+5:30

हे खंडग्रास सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार

Next Sunday penumbral solar eclipse will not be visible from India! Information from Dr. K. Soman | येत्या रविवारचे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही! दा.कृ.सोमण यांची माहिती

येत्या रविवारचे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही! दा.कृ.सोमण यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, या सूर्यग्रहणाच्यावेळी चंद्रबिंब ८५ टक्के सूर्यबिंबाला झाकून टाकणार आहे. हे सूर्यग्रहण १५४ सरॅास ग्रहणचक्रातील आहे.

सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत.

(१) खंडग्रास सूर्यग्रहण - ज्यावेळी सूर्यबिंबाचा थोडा भाग चंद्रबिंबाद्वारे झाकला जातो त्यावेळी ‘ खंडग्रास सूर्यग्रहण ‘ दिसते.
(२) खग्रास सूर्यग्रहण - ज्यावेळी चंद्रबिंबामुळे संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी ‘ खग्रास सूर्यग्रहण ‘ दिसते.
(३) कंकणाकृती सूर्यग्रहण- खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा ( कंकणासारखी ) दिसते. त्याला’ कंकणाकृती सूर्यग्रहण ‘ दिसते. सूर्यग्रहण हे कधीही

साध्या डोळ्यांनी पहावयाचे नसते. तसे पाहिल्यास दृष्टीस इजा होते. अंधत्व येण्याची शक्यता असते. म्हणून सूर्यग्रहण हे ग्रहणचष्म्यातूनच पहावयाचे असते.

भारतातून दिसणारे यापुढील सूर्यग्रहण २ ॲागस्ट २०२७ रोजी होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. ते जरी खग्रास सूर्यग्रहण होणार असले तरी भारतातून ते खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.

सोमण यांनी यानंतर होणा-या १० सूर्यग्रहणाचे दिवसही सांगितले.

(१) कंकणाकृती सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६.
(२) खग्रास सूर्यग्रहण १२ ॲागस्ट २०२६.
(३) कंकणाकृती सूर्यग्रहण  ६ फेब्रुवारी २०२७.
(४) खग्रास सूर्यग्रहण २ ॲागस्ट २०२७.
(५) कंकणाकृती सूर्यग्रहण २६ जानेवारी २०२८.
(६) खग्रास सूर्यग्रहण २२ जुलै २०२८.
(७) खंडग्रास सूर्यग्रहण १४ जानेवारी २०२९.
(८) खंडग्रास सूर्यग्रहण १२ जून २०२९.
(९) खंडग्रास सूर्यग्रहण ११ जुलै २०२९.
(१०) खंडग्रास सूर्यग्रहण ५ डिसेंबर २०२९.

Web Title: Next Sunday penumbral solar eclipse will not be visible from India! Information from Dr. K. Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.