सफाळे-विरार रोरो सेवेमुळे वाचले नवजात बाळाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 05:16 IST2025-05-15T05:15:20+5:302025-05-15T05:16:24+5:30
विरार नारिंगी (चिखल डोंगरी) ते सफाळे (खारवाडेश्री) दरम्यान सुरू झालेली रोरो सेवा जीवदायिनी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सफाळे-विरार रोरो सेवेमुळे वाचले नवजात बाळाचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क, सफाळे : सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर महिलेच्या नवजात बाळाची तब्येत मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यामुळे बाळाला तत्काळ विरारला घेऊन जाण्यास डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा सेवेचा कालावधी संपलेला असतानाही रोरो बोट सुरू करून या बाळाला ॲम्ब्युलन्सने विरार येथे नेण्यात आले. तेथे वेळीच उपचार मिळाल्याने या नवजात बाळाचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे विरार नारिंगी (चिखल डोंगरी) ते सफाळे (खारवाडेश्री) दरम्यान सुरू झालेली रोरो सेवा जीवदायिनी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री अस्मिता जाधव यांच्या नवजात बाळाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. अशा परिस्थितीत अधिक उपचारासाठी विरारच्या रुग्णालयात मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून तातडीने पोहोचणे शक्य नव्हते. रात्री साडेदहा वाजता जेटीवर संपर्क केला असता रोरोची शेवटची फेरी सुटल्याचे सांगण्यात आले. तेव्हा जलसारचे उपसरपंच विकोष म्हात्रे यांनी बोटीने रुग्णवाहिका तातडीने पलिकडे नेण्यासाठी जेटी व्यवस्थापकांना विनंती केली. त्यावेळी टेभीखोडावे पोलिस पाटील सुनील पाटील उपस्थित होते.