नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर
By Admin | Updated: October 12, 2016 04:41 IST2016-10-12T04:41:39+5:302016-10-12T04:41:39+5:30
ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार जुन्या ठाण्यातील

नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार जुन्या ठाण्यातील कोपरी, वागळे पट्यातील जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे या भागातून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत शिवसेनेमध्ये खलबते सुरु असतांनाच आता ही नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची खंत थेट भाजपाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला ही प्रभाग रचना कशी फायदेशीर ठरु शकते याची कारणमिमांसाच स्थानिक पदाधिकारी श्रेष्ठींकडे विषद करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच भाजपाने अवसान गाळल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ७ आॅक्टोबरला जाहीर झाली. तर प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही प्रसिद्ध झाला आहे. या प्रभाग रचनेनुसार वागळे इस्टेट, कोपरी भागात यंदा नगरसेवकांची संख्या १० ने घटली आहे. नव्या समीकरणानुसार येथून ३२ नगरसेवक निवडून येणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र काहीसा दिलासा मिळाला असून कळव्यातून १६ तर मुंब्य्रातून २० नगरसेवक निवडून येणार असल्याने त्यांना या भागांतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर परिसरातून चार जादा नगरसेवक निवडून येणार असून नव्या रचनेत येथील प्रभागांची संख्या १२ झाली आहे. परंतु जुन्या ठाण्यातील नगरसेवकांची संख्या कमी झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु असे असले तरीदेखील या प्रभाग रचनेचा फायदा हा शिवसेनेलाच होऊ शकतो, किंबहुना ती शिवसेनेच्याच पथ्यावर पडणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे फारसे अस्तित्व नसलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातून तर तब्बल ४५ म्हणजेच एक तृतीयांश नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे पालिकेत स्वबळाची स्वप्ने बघणाऱ्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेचे निरिक्षण केल्यानंतर भाजपच्या विद्यमान नगगरसेवकांची सुद्धा कोंडी होईल अशा पद्धतीची रचना असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
नौपाडा, वृंदावन सोसायटी आदी परिसरातील प्रभागरचना पाहिल्यानंतर तसा संशय घेण्यास जागा असल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)