लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष निधीच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश नेतृत्वा कडे केली आहे.
मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या ८ ते १० जणांचे सह्या केलेले पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे , उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव , ठाणे - पालघर समन्वयक आनंद परांजपे यांच्या नावाने दिलेले आहे . ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा मतदार संघच्या निवडणूक प्रचार - प्रसार साठी कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे .
ठाणे लोकसभा आणि मीरा भाईंदर मधील दोन्ही विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे कोणतेही पद नसताना प्रमोद कांबळे यांना दिले गेली होती . परंतु कांबळे यांनी निवडणुकीची दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी अभद्र व्यावहार करणे , तानशाही करणे , पैशाच्या रूपात कार्यकर्त्यांना मानधन न देणे अश्या अयोग्य गोष्टी निवडणुकी दरम्यान कांबळे यांनी केल्या आहेत .
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार व प्रसार साठी मिळालेल्या धनराशीचे वाटप कांबळे यांनी फक्त जवळच्या काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाच केले . उर्वरित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना त्यांचे मानधन मिळू दिले नाही . तसेच योग्य ठिकाणी त्या धनराशीचा विनियोग देखील केला नाही . हा भ्रष्टाचार असून जुन्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां मध्ये झालेल्या प्रकारा बाबत तीव्र नाराजी आहे . त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रमोद कांबळे यांना प्रचार व प्रसार साठी दिलेल्या धनराशीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी विनंती पत्रात पदाधिकाऱ्यांनी केली आहे .
लोकमतच्या हाती सादर पत्र लागले असून त्यावर सही केलेल्या एका पदाधिकाऱ्याशी तसेच अन्य एका प्रदेश पदाधिकाऱ्याशी देखील बोलून त्याची खात्री केली . पक्षाचा विषय असल्याने आमचे नाव - पद तसेच प्रतिक्रिया देऊ नका असे देखील त्यांनी सांगितले .
प्रमोद कांबळे - काही जणांनी केलेल्या त्या तक्रारीत अजिबात तथ्य नाही . त्यातही जे प्रचारात नव्हते तर काही जण दोन चार दिवस प्रचारात होते त्यांनी तक्रार केली आहे . मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मला मिळू नये म्हणून हे कारस्थान रचले गेले आहे . ह्या सर्व कारस्थानाची कल्पना आपण आपल्या नेतृत्वास दिली आहे .