गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:00 IST2025-05-24T06:00:09+5:302025-05-24T06:00:40+5:30
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.

गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गडचिरोलीतील नक्षलवादाचा राज्य शासनाने जवळपास बीमाेड केला असून वर्षभरात त्याचे समूळ उच्चाटन केले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ठाण्यातील नितीन कंपनी येथील खासगी निवासस्थानातून मुंबईकडे जाताना ते पत्रकारांशी बोलत होते.
कारवाई होणारच
शिंदे म्हणाले की, गृहमंत्री शाह हे नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. ३१ मे २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवादाचा खात्मा करण्याचे केंद्र सरकारची भूमिका आहे. पाकिस्तानने भारतावर यापूर्वी हल्ले केले, तेव्हा तत्कालीन राज्यकर्त्यांनी खंबीर भूमिका घेतली नाही, परंतु मोदींनी पाकिस्तानविरोधात कारवाईचा धडाका लावला. ही गौरवाची बाब आहे. धुळे राेकड प्रकरणात, तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. ज्यांनी कोणी गुन्हा केला आहे, त्यांची गय केली जाणार नाही.