ठाण्याच्या निवडणुकीत नथुराम आणि सावरकर!

By Admin | Updated: February 23, 2016 02:22 IST2016-02-23T02:22:55+5:302016-02-23T02:22:55+5:30

शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम’वरील नाटकाच्या निमित्ताने हिंदुत्ववादी विचारांची उडवून दिलेली राळ, त्याच वेळी सावरकरांच्या विचारांचा धरलेला आग्रह पाहता त्या

Nathuram and Savarkar in Thane elections! | ठाण्याच्या निवडणुकीत नथुराम आणि सावरकर!

ठाण्याच्या निवडणुकीत नथुराम आणि सावरकर!

ठाणे : शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम’वरील नाटकाच्या निमित्ताने हिंदुत्ववादी विचारांची उडवून दिलेली राळ, त्याच वेळी सावरकरांच्या विचारांचा धरलेला आग्रह पाहता त्या पक्षातर्फे याच विचारसरणीचा आधार घेत पुढील वर्षीची ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली जाईल, असा अंदाज आहे. भाजपाचाही भर याच विचारसरणीवर असल्याने या दोन्ही पक्षांतील नेमके कोण मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी होतो, त्यावर युतीतील लहानमोठ्या भावांची स्थिती स्पष्ट होईल.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ब्राह्मण मतांच्या ध्रुवीकरणावर वेगवेगळ्या लढलेल्या शिवसेना आणि भाजपाने तसेच त्यांच्या परिवाराने भर दिला होता. कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याच काळात सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा लावून धरत त्यासाठी मिस्ड कॉल देण्याची मोहीम राबवली होती. त्यावर, पुढे फारसे काही झाले नसले तरी पक्षाला या पांढरपेशी समाजाची मते मिळवण्यासाठी त्याचा फायदा झाला. त्यासाठी काही वॉर्डांत ठरवून शरद पोंक्षे यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या.
ठाण्यातही त्याच पद्धतीने नाट्यसंमेलनाचा आधार घेत रविवारच्या सकाळी पोंक्षे यांची खास मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीची वेळ रीतसर वाढवून देत प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची मुभा दिली गेली. त्यातील एखाददुसरा प्रश्न विचारता उरलेले प्रश्न धर्म, विचारसरणी, नथुराम, राष्ट्रवाद, देशभक्ती, असहिष्णुता याच मुद्याभोवती होते. तसेच नाटकाच्या रूपातून नथुरामला पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन देताच झालेला टाळ्यांचा कडकडाट आणि गांधी-नेहरूंबद्दलच्या विशिष्ट वक्तव्यांवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया यामुळे ती एक प्रकारे प्रचाराची नांदीच ठरली.
पोंक्षे यांनी नथुराम नाटकातील संवाद म्हणून दाखवतानाही खटल्यात सावरकरांचे नाव येऊ नये, यासाठी दिगंबर बडगे यांच्या साक्षीपूर्वी नथुराम आणि त्यांची झालेली भेट आणि त्या वेळी नथुरामने केलेला उपदेश उपस्थितांना ऐेकवला. फक्त, नथुरामवर १० मिनिटे बोला असा झालेला आग्रह, नेहरूंना गोळ्या घालण्याचा मुद्दा, यावर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली गेली आणि ती समाजाच्या मनातील खदखद असल्याचेही व्यासपीठावरून सांगितले गेले. पोंक्षे यांनी संघाच्या बोटचेप्या वृत्तीवरही टीका केली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारातील चुणूकच यातून मिळाल्याचे मानले जाते.
नथुराम, हिंदुत्व, ब्राह्मण्य हे विषय भाजपाच्याही अजेंड्यावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपाचे हिंदुत्व असा सामना येत्या काही दिवसांत रंगण्याची चिन्हे आहेत.

ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा? : मी दहावीनंतर शिकलो नाही आणि त्यामुळे माझे काही अडले नाही, असे सांगत भारतीय शिक्षणपद्धतीवर टीका करणाऱ्या पोंक्षे यांनी ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दाही आडूनआडून उपस्थित केला. शिक्षणाबाबत मी माझी भूमिका घरामध्ये व्यक्त केल्यानंतर कोणत्याही एकारान्त ब्राह्मण कुटुंबात व्यक्त होईल तशीच प्रतिक्रिया माझ्याही घरात व्यक्त झाली. आपल्याला आरक्षण नाही बाबा, त्यामुळे ग्रॅज्युएट तरी हो, असा सल्ला मला देण्यात आला होता, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: Nathuram and Savarkar in Thane elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.