Nashik jailed for murder in firing case | गोळीबारासह खून प्रकरणातील आरोपी नाशिकमध्ये जेरबंद

गोळीबारासह खून प्रकरणातील आरोपी नाशिकमध्ये जेरबंद

ठाणे : कळव्याच्या दुकानात चोरीसाठी शिरकाव करून कामगारावर गोळीबार करून त्याच्या खून करणाऱ्या आरोपीला नाशिक गुन्हे मध्यवर्ती शोध पथकाने गुरुवारी अटक केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कळवा पूर्वेतील शिवाजीनगर येथे वीर युवराज या मेडिकल दुकानात प्रेमसिंग हे २७ डिसेंबर २०१९ रोजी झोपले होते. २८ डिसेंबर रोजी पहाटे शटर उचकटून सरफराज अन्सारी (२६, रा. नाशिक) या चोरट्याने दुकानात शिरकाव केला. तेव्हा झोपलेल्या प्रेमसिंग यांना जाग आल्याने सरफराजने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरने प्रेमसिंगवर गोळीबार केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, दुकानातील रोकड लुटली. हे थरारनाट्य दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.

कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे होता. ठाण्यासह भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट, कळवा पोलिसांचे अशी ६ पथके आरोपीचा तीन आठवडे शोध घेत होती. पथकाने या मेडिकलसह परिसरात, तसेच रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीची पडताळणी केली. ठाणे पोलिसांना यात आणखी दोन महिलांचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्यांचा शोध घेण्यासाठी आरोपींची माहिती राज्यातील सर्व पोलीस स्थानकांना देण्यात आली. दरम्यान, नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाला या महिला आडगाव येथील झोपडपट्टी परिसरात आढळल्या. चौकशीत मूळचा झारखंड येथील रहिवासी असलेला सरफराजचे नाव पुढे आले. त्याचा शोध घेऊन नाशिक पोलिसांनी १६ जानेवारीला त्याला अटक केली. आडगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nashik jailed for murder in firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.