Naresh Mhaske vs Sanjay Raut: संजय राऊत यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक आरोप केला. एकनाथ शिंदे हे काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये जाणार होते, असे ते म्हणाले. या आरोपाचे शिंदे गटाकडून खंडन करण्यात आले. याच मुद्द्यावर बोलताना शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. "संजय राऊत यांची कालची भांग उतरलेली नाही असं मी म्हणणार नाही. कारण रोजच संजय राऊत नशा करुन वक्तव्य करत असतात," असे म्हस्के म्हणाले.
"एकनाथ शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी इन्कार केलेला आहे. त्यांनी नकार दिलेला आहे. पण मला संजय राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की, जर तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं? नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते का?" असे रोखठोक सवाल म्हस्के यांनी राऊतांना केले.
एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होतात. तुम्ही त्यांना घाबरत होतात, त्यांची लोकप्रियता पाहून तुम्हाला भीती वाटत होती, त्यांची लोकप्रियता आहे हे तुम्हीही मान्य केलं होतं. ते काँग्रेसमध्ये जाणार होते असं तुम्ही म्हणताय. एकनाथ शिंदे यांच्याच मागे सर्व पक्ष का लागले असतील, कारण जनतेमध्ये ते फार लोकप्रिय आहेत. ज्या झाडाला फळं लागतात, त्याच झाडाला लोक दगड मारतात," असा खोचक टोला म्हस्के यांनी लगावला.