गुंतवणूकदारांना फसवणा-या नारायण ठक्करच्या जप्त मालमत्तेतून सव्वा कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांना वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:36 IST2017-11-02T14:33:59+5:302017-11-02T14:36:38+5:30
ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या रक्कमेचे बुधवारी वाटप करण्यात आले.

गुंतवणूकदारांना फसवणा-या नारायण ठक्करच्या जप्त मालमत्तेतून सव्वा कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांना वाटप
ठाणे : ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या रक्कमेचे बुधवारी वाटप करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथील एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते या रक्कमेचं वाटप करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळ्यातील अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ६ अन्वये विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील एमपीआयडी अंतर्गत दाखल झालेले दावे जिल्हा न्यायाधीश-६तथा विशेष एम. पी. आय.डी न्यायाधीश प्र.पु.जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात घेता गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांनी चौकशी व पडताळणी केली होती.
'जनतेच्या काबाडकष्ट करुन जमविलेल्या पुंजीची रक्कम मिळण्यासाठी जो लढा गुंतवणुकदारांनी दिला त्याला यश आले. जे आता हयात असतील अशा गुंतवणूकदारांच्या वारसांना वारसाचा दाखला सादर करुन रक्कम घेता येईल', असे यावेळी उपविभागीय दंडाधिकारी सुदाम परदेशी म्हणालेत. गुंतवणुकदार प्रतिनिधी रणजीत चित्रे ,डी.एम.नाडकर्णी ,प्रभाकर टावरे यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ झाल्याचे सांगितले तसेच कायदा आणि प्रशासनाचे आभार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास विधी सेवा समिती सचिव पी.एम. मोरे, शासनाचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.