केमिकल टाकणाऱ्याचे नाव सांगा, लाखाचे बक्षीस मिळवा; यंत्रणा अपयशी ठरल्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 07:00 IST2020-11-14T01:13:31+5:302020-11-14T07:00:02+5:30
वालधुनी नदी प्रदूषित

केमिकल टाकणाऱ्याचे नाव सांगा, लाखाचे बक्षीस मिळवा; यंत्रणा अपयशी ठरल्याची टीका
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीपात्रात केमिकल टाकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रात केमिकल टाकणाऱ्यांची नावे सांगणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस स्थानिक नगरसेवक टोनी सिरवानी यांनी जाहीर केले आहे. तसेच प्रदूषण मंडळ, पोलीस प्रशासन व महापालिका अपयशी ठरल्याची टीका यावेळी सिरवानी यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली.
वालधुनी नदी शहराला वरदान ठरण्याऐवजी शाप ठरली आहे. नदीपात्रात अंबरनाथ केमिकल झोन परिसरातील कारखाने विषारी द्रव्य नदीत सोडत असल्याने नदीचे पाणी दर पाच मिनिटाने रंग बदलते. हे कमी म्हणून की काय टँकरमधून आणलेले घातक केमिकल नदीपात्रात टाकत असल्याने पाण्याला उग्र दर्प येतो. यामुळे नागरिकांना उलट्या होणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अंगाला खाज सुटणे असे त्रास होतात.
बुधवारी रात्री नदीच्या पाण्याचा उग्र दर्प येत असल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक सिरवानी, गजानन शेळके, कविता पंजाबी यांच्याकडे धाव घेतली. या प्रकाराची माहिती पोलिसांसह महापालिका व प्रदूषण मंडळाला दिल्यावरही कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती सिरवानी यांनी दिली.
या नगरसेवकांनी गुरुवारी नागरिकांची बैठक घेतली. नदीपात्रात केमिकल टाकणाऱ्यांची माहिती जो देईल, त्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले. यापूर्वी असाच प्रकार झाल्यावर नागरिकांना विषारी वायूची बाधा होऊन रुग्णालयात दाखल केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी नदीपात्रातून उग्र दर्प येत असल्याने स्थानिक नगरसेवक, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नदीकिनारी रात्रभर गस्त घातली होती.