...तर आम्ही आत्महत्या करायची का?; बँकेत पगार जमा होणाऱ्या कर्मचाऱ्याची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 05:36 IST2025-02-15T05:36:41+5:302025-02-15T05:36:59+5:30
ठाणे पालिकेतून निवृत्त झालेल्या सुनील तंबडवार यांचीही दीड लाखाची रक्कम आहे. तातडीने हे पैसे मिळावेत, अशी त्यांनी मागणी केली.

...तर आम्ही आत्महत्या करायची का?; बँकेत पगार जमा होणाऱ्या कर्मचाऱ्याची व्यथा
जितेंद्र कालेकर
ठाणे : बँकेतच महिन्याचा पगार जमा हाेताे. आता हे पैसेच मिळणार नसतील, तर मग आत्महत्या करायची का, असा सवाल न्यू इंडिया काे आपरेटिव्ह बँकेचे खातेदार किशार परब यांनी केला आहे. अचानक बँक बंद झाल्याने बँकेच्या दीड हजाराहून अधिक खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाण्यातील वसंत विहार येथील या बँकेसमाेर अनेक ग्राहकांनी त्यांच्या लाॅकरमधील किमती दागिने काढून घेण्यासाठी तसेच बँकेत चाैकशीसाठी शुक्रवारी सकाळपासून गर्दी केली हाेती. परब हे एका खासगी माेटार शाेरूममध्ये कामाला आहेत. त्यांचा महिन्याचा पगार याच बँकेत जमा हाेतो. शिवाय त्यांच्या तीन लाखांच्या ठेवीही याच ठिकाणी आहेत. १९९२ पासून याचठिकाणी खाते आहे. हे पैसे कधी मिळणार याची माहिती नसल्याने आपण आत्महत्या करायची का, असा त्रागा परब यांनी केला. ठाणे पालिकेतून निवृत्त झालेल्या सुनील तंबडवार यांचीही दीड लाखाची रक्कम आहे. तातडीने हे पैसे मिळावेत, अशी त्यांनी मागणी केली.
दरम्यान बँकेवरील निर्बंधाचा सर्वाधिक त्रास निवृत्त आणि ज्येष्ठांना होणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर काही मार्ग काढता येईल का, यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी, अशी मागणी केल्याचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.
नियमित आणि प्रामाणिक ठेवीदार आहोत. बँकेने जाे काही घाेटाळा केला, यात आमचा काय दाेष? चार दिवसांपासून एटीएमही बंद झाले. हार्टचा आजार असल्याने नियमित मेडिकलचे चेकअप आणि औषधाेपचार कसे करायचे? - संगीता समजिसकर, खातेदार, ठाणे
सहा महिन्यांनी पैसे मिळतील कशावरून? बँकेतही पैसे सुरक्षित नसतील तर पैसे ठेवायचे कुठे? पैसे तातडीने मिळाले पाहिजेत? - वैभव पाटील, खासगी चालक, खातेदार
बँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत हाेतील, अशी अपेक्षा आहे. माझे खाते आणि लाॅकरही आहे. - सुरेश जंजाळ, निवृत्त, हिंदुस्थान पेट्राेलियम अधिकारी, ठाणे
बँकेवर निर्बंध आले यात आमची काहीच चूक नाही. मग खातेदारांना शिक्षा का? - कविता सुखरामाणी, खातेदार, ठाणे
माझ्या संपूर्ण कुटुंबीयांचे बँक खाते या ठिकाणी आहे. त्यामुळे सहा ते सात लाख रुपयांची रक्कम अडकली. - लक्ष्मण भाेये, शाखाप्रमुख, शिंदेसेना, ठाणे