माझे शिक्षण ही मराठी माध्यमातूनच झाले : माजी न्या. अभय ओक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:24 IST2025-07-10T15:24:20+5:302025-07-10T15:24:43+5:30
सर्वोच्च न्यायालयातील मी आणि भूषण गवई हे दोनच न्यायाधीश असे आहे की ज्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही.

माझे शिक्षण ही मराठी माध्यमातूनच झाले : माजी न्या. अभय ओक
ठाणे : सर्वोच्च न्यायालयातील मी आणि भूषण गवई हे दोनच न्यायाधीश असे आहे की ज्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मराठी शाळेत असूनही माझ्या शाळेने मला इंग्रजी भाषेचे शिक्षण अतिशय चांगले दिले आहे. गाडगीळ बाईंनी आमचे व्याकरण पक्के केले. असा विश्वास सर्वोच्च न्यायायलयाचे माजी न्यायाधीश अभय ओक यांनी आज व्यक्त केला.
गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त मो. ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे आणि अभिरुची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी, माजी न्या. ओक यांच्या हस्ते आदर्श आजी शिक्षिका म्हणून कृपा घाग, आदर्श माजी शिक्षिका म्हणून विजया यादव आणि आदर्श शिक्षकेतर म्हणून मनोहर दळवी यांना गौरविण्यात आले. तसेच, मंडळाचे अध्यक्ष रविंद्र तामरस यांच्या हस्ते ओक यांचा देखील मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा शाळेतील माझा शेवटचा सत्कार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ओक पुढे म्हणाले की, पुर्वी शाळेत शिक्षा केली की, पालकांना बरे वाटायचे आणि आज मा६ पालक जाब विचारतात. सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती बदलली आहे आणि हे का झाले यावर चर्चा व्हावी. शिक्षण संस्थेत अजून एक मोठा बदल व्हावा तो म्हणजे शाळेत भगवदगीता असण्याऐवजी घटनेच्या प्रस्तावनेचा उल्लेख करा ज्यामुळे विद्यार्थ्यांवर नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये बिंबवले जातील. कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी म्हणाले की, वेळ हा सगळ्यात मोठा गुरु आहे. त्याचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे.
सगळ्या गोष्टी परत येतात पण ती एकच गोष्ट आहे की ती परत येत नाही. बदलत्या गोष्टींना स्वीकारायला शिका. एक्सेप्टन्स आणि फ्लेक्सिबिलिटी मधून खूप काही शिकण्यासारखे असते. शिक्षकांनो तुम्ही पण गुरूस्थानी राहायला शिका. मुख्याध्यापक विकास पाटील यांनी प्रास्ताविक तर डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनी सुत्रसंचालन केले. स्नेहा शेडगे यांनी ओक यांचा परिचय करुन दिला. सुरूवातीला मराठी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थीनींनी गुरूचे महत्त्व पटवून दिले.