वर्चस्वाच्या वादातून डोंबिवलीत सराईत गुन्हेगाराची हत्या; चौकडीविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 00:39 IST2020-03-14T00:39:30+5:302020-03-14T00:39:40+5:30

हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना

Murder in Dombivli in the Dombivali; Offense against the quartet | वर्चस्वाच्या वादातून डोंबिवलीत सराईत गुन्हेगाराची हत्या; चौकडीविरोधात गुन्हा

वर्चस्वाच्या वादातून डोंबिवलीत सराईत गुन्हेगाराची हत्या; चौकडीविरोधात गुन्हा

डोंबिवली : गुन्हेगारीतील वर्चस्वातून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून सराईत गुन्हेगार सागर खैरनार (२५, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी) याच्यावर तलवार आणि चॉपरने वार करत हत्या केल्याची घटना कोळेगाव येथे शुक्रवारी पहाटे घडली. सागरवर हल्ला करून पोबारा केलेल्या चौकडीचा शोध मानपाडा पोलीस घेत आहेत.

सावन शिरसाठ, सूरज सोनवणे, सुजीत नेरकर यांच्यासोबत सागर आणि त्याचा मित्र बाळासाहेब जाधव हे शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास जेवण करण्यासाठी बदलापूर येथील खोणी फाटा येथे रिक्षाने गेले होते. तेथून ते सर्व जण सुमारे ४.३० च्या सुमारास त्याच रिक्षाने बदलापूर मार्गे घरी जाण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान थंडी वाजू लागल्याने रिक्षात मागील बाजूस मध्यभागी सागर बसला होता.
बाळासाहेब याला घरी जायचे असल्याने त्याने बदलापूर पाइपलाइनमार्गे रिक्षा नेण्यास सावनला सांगितले. मात्र, मुख्य रस्त्याऐवजी कोळेगावातील लहान रस्त्याने सावन रिक्षा घेऊन जात होता. पहाटे ५ च्या सुमारास कोळेगावातील नाल्याजवळ सावनने रिक्षा थांबवली. तेथे आधीपासूनच उभ्या असलेल्या महेश वळवेने आपल्या जवळील चाकूने सागरवर हल्ला केला, तर सावनसह सुजीत, सूरजनेही आपल्याकडील हत्याराने सागरवर २० ते २५ वार केले.

याच दरम्यान, परिसरात लोकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने या चौघांनी सागरला फरफटत कल्याण-शिळ रोडला घेऊन गेले. कोळेगाव येथील रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात सागरला टाकून चौकडीने तेथून पोबारा केला. या प्रकरणी सागरचा मित्र बाळासाहेब याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी चौकडीविरोधात गुन्हा दाखल केला.

काही दिवसांपूर्वीच घेतली होती शपथ
सागर आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये पूर्वीपासूनच भांडणे होत होती. वर्चस्व नेमके कोणाचे यावरून होणारे भांडण नेहमीचेच झाले होते. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी या सर्वांनी आपापसातली भांडणे सोडवली होती. इतकेच नाहीतर पुन्हा आपण एकमेकांसोबत भांडण करायचे नाही, अशी शपथही घेतली होती.

सागर हा सराईत गुन्हेगार
सागर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल होते, तर त्याची हत्या करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Murder in Dombivli in the Dombivali; Offense against the quartet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून