गोंदलेल्या ‘देवा भाई’मुळे फुटली खुनाला वाचा; प्रेमाच्या ‘त्रिकोणा’तून केले कृत्य
By जितेंद्र कालेकर | Updated: May 15, 2025 06:17 IST2025-05-15T06:15:41+5:302025-05-15T06:17:14+5:30
प्रेमाच्या अनैतिक त्रिकाेणी संबंधातून एका महिलेच्या इशाऱ्यावरुन पहिल्या प्रियकराने खून केल्याची माहिती समोर आल्यानंंतर महिलेसह तिघांना ‘एलसीबी’ने अटक केली.

गोंदलेल्या ‘देवा भाई’मुळे फुटली खुनाला वाचा; प्रेमाच्या ‘त्रिकोणा’तून केले कृत्य
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गालगत मिळालेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले. पोलिस पाटलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील व्हायरल मेसेज आणि मृताच्या हातावर गोंदलेल्या ‘देवा भाई’ नावाने या खुनाला वाचा फुटली. प्रेमाच्या अनैतिक त्रिकाेणी संबंधातून एका महिलेच्या इशाऱ्यावरुन पहिल्या प्रियकराने खून केल्याची माहिती समोर आल्यानंंतर महिलेसह तिघांना ‘एलसीबी’ने अटक केली.
मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत ३० वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह शहापूरच्या उंबरखांड गावाजवळ टाकल्याचा प्रकार ३० एप्रिल रोजी सकाळी समोर आला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाेलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी हे प्रकरण समांतर तपासासाठी ‘एलसीबी’कडे सोपविले. ‘एलसीबी’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आणि शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी तपासासाठी पथके तयार केली.
‘तिच्या’च साठी केला खून
सिन्नरमधील महिलेचे अशोकबरोबर ‘संबंध’ होते. वर्षभरानंतर तिने त्याला सोडले. पुढे वसीम या पहिल्या प्रियकराच्या ती संपर्कात आली. याच प्रेमाच्या ‘त्रिकोणा’तून वाद झाले. त्यानंतर महिलेच्या इशाऱ्यावरून वसीम व राहुल यांनी अशोकचा खून करून मृतदेह मुंबई- नाशिक महामार्गालगत टाकल्याचे तपास उघड झाले.
गोंदलेल्या नावाने पटली ओळख
मृतदेहाच्या डाव्या हातावर ४९१-देवा भाई, उजव्या हातावर इंग्रजीत एका मुलीचे नाव तर हाताच्या तळव्याच्या पाठीमागे ‘ए’ असे इंग्रजीत गोंदलेले होते. त्याच्या गळ्यात ताईत असल्याची माहिती व्हॉट्सॲप मेसेजद्वारे व्हायरल झाली. त्यानंतर हा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक मधेचा असल्याची माहिती एका पोलिस पाटलाकडून मिळाली. त्यानंतर ‘एलसीबी’चे उपनिरीक्षक महेश कदम आणि शहापूरचे उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी संबंधित गावात जाऊन तपास केला. अशोक हा त्याच गावातील वसीम पठाण याच्याबरोबर गेल्याची माहिती मिळाली. वसीमला ताब्यात घेतल्यानंतर राहुल गुंजाळ या साथीदाराच्या मदतीने अशोकचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर गुंजाळलाही पोलिसांनी १० मे रोजी अटक केली.
सोशल मीडियाचा वापर
दोन्ही पथकांनी घटनास्थळापासूनच्या अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. राज्यभरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिस ठाण्यांमधून काढली. मृतदेहाच्या फोटोचे स्टीकर बनवून ठिकठिकाणी माहिती प्रसिद्ध केली. राज्यातील पोलिस पाटलांसह विविध व्हॉट्सॲप ग्रुपवरही माहिती दिली.