मुरबाडकरांची दिवाळी अंधारात; ३० तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:29 IST2025-10-22T20:29:54+5:302025-10-22T20:29:54+5:30
या वीजपुरवठ्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद राहतात तर नागरिकांचे वीजेवर चालणारे व्यवसाय देखील बंद राहत आहेत

मुरबाडकरांची दिवाळी अंधारात; ३० तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण अपयशी
प्रकाश जाधव
मुरबाड - मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागातील २०६ गावातील विजपुरवठा बंद असल्याने सुमारे तीस तास उलटूनही हा वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात महावितरण ला अपयश आले असल्याने दिवाळी पाडवा सण नागरिकांना अंधारात साजरा करावा लागला आहे.
मुरबाड तालुक्यातील नागरिकांना विजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दरवर्षी महावितरण कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविते परंतु तुरळक पाऊस झाला तरी महावितरण चा वीजपुरवठा चार ते पाच तास खंडित होतो. या वीजपुरवठ्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद राहतात तर नागरिकांचे वीजेवर चालणारे व्यवसाय देखील बंद राहत आहेत. या बंद उद्योगामुळे नागरिकांचे आणि महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होतेच शिवाय नागरिकांना या खंडीत वीजपुरवठ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे निदान खंडीत वीजपुरवठ्यामुळे महावितरण लाखोंचे नुकसान होते त्यासाठी त्यांचेकडे असणारे ठेकेदार तसेच इतर यंत्रणा सतर्क ठेवण्याची गरज आहे.