महामारीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ना रान माेकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:38+5:302021-06-30T04:25:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महामारीत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि कोविड फायटर फॅमिली डॉक्टर यांच्या मदतीने ...

Munnabhai MBBS in the epidemic | महामारीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ना रान माेकळे

महामारीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ना रान माेकळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महामारीत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि कोविड फायटर फॅमिली डॉक्टर यांच्या मदतीने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेशी सामना करता आला. महापालिका हद्दीत बोगस डॉक्टरही नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळत आहेत. त्यांचा शोध महापालिकेकडून घेतला जात नाही. बोगस डॉक्टरांच्याविरोधात तक्रार आली, तरच महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून संबंधित डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची शहानिशा सुरू होते. वर्षभरात एकाही बोगस डॉक्टरच्या विरोधात कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापालिका हद्दीतील बोगस डॉक्टरांना कारवाईचे भय नाही. त्यांच्यासाठी महापालिका प्रशासनाकडून रान मोकळे सोडण्यात आले आहे.

महापालिकेकडे आरोग्य यंत्रणा तोकडी होती. त्यामुळे महापालिकेने ३९१ डॉक्टर्स, नर्स, वाॅर्डबॉय, तंत्रज्ञ यांची भरती केली. तसेच, खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोरोनावर मात केली. कोरोना काळात महापालिकेस इतर गोष्टी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. इतकेच नाही, पावसाळ्यातील साथरोगांकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्यास वेळ मिळाला नाही. तसेच बोगस डॉक्टरांचा शोध कुठून घेणार, त्यासाठी वेळ कुठे आहे, अशी सबब प्रशासनाकडून सांगण्यात आली. त्यामुळे बोगस डॉक्टरांची शोधमोहीम घेतली गेली नाही. कोरोनाशी लढा देणार, की बोगस डॉक्टर शोधणार, असा प्रश्न प्रशासनासमोर होता. महामारीत बोगस डॉक्टरांकडून चुकीचे उपचार केले गेले, तर आधीच कोरोना, त्यात मृत्यूला आमंत्रण हमखास असा प्रकार होणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी बोगस डॉक्टरांचा शोध घेतला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

-----------------------------------

प्रमाणपत्राची हाेेते शहानिशा

महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, बोगस डॉक्टरांचा शोध महापालिका घेत नाही. एखादा डॉक्टर बोगस असल्यास त्याच्याविरोधात आमच्या खात्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित डॉक्टरकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र आहे की नाही, याची शहानिशा केली जाते. एका डॉक्टरच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाली होती. मात्र त्याची शहानिशा सुरू आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत बोगस डॉक्टरांच्या तक्रारी आल्या, तर नक्कीच कारवाई केली जाते.

----------------------------------

१़ जिवाशी खेळ

कोरोना काळात महापालिका हद्दीत फॅमिली डॉक्टरांनी महापालिकेस चांगल्या प्रकारे मदत केली. मात्र, काही बोगस डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसायातील माहिती नाही. त्यांनीही रुग्णांच्या तपासण्या केल्या. त्यांना चुकीचे सल्ले दिले. त्यामुळे कोरोना रुग्णांची चाचणी आणि निदान उशिराने झाल्याने रुग्णांचा कोरोना आजार बळावला. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली. काहींनी ही माहितीच लपविली. त्यामुळे त्यांच्याकडून रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार झाला.

२. एकाचा झाला होता मृत्यू

कोरोना काळात कल्याण पूर्व भागातील एकाने डॉक्टर नसतानाही रुग्णालय चालविण्यास घेतले होते. त्याने कोरोना रुग्णावर उपचार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्याविरोधात महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

३. ग्रामीण भागात सुळसुळाट

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या छत्राखाली कल्याण आणि डोंबिवली ॲलोपॅथीचे जवळपास ९०० डॉक्टर आहेत. अन्य पॅथीचेही डॉक्टर मिळून जवळपास एकूण तीन हजार डॉक्टर व्यवसाय करीत आहेत. ज्या डॉक्टरांकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र आहे, ते अधिकृत आहेत. बोगस डॉक्टरांच्याविरोधात सक्त कारवाई केली गेली पाहिजे. महापालिका हद्दीत जवळपास ४० बोगस डॉक्टर असण्याची शक्यता आहे. विशेषत: महापालिका हद्दीला लागून असलेल्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टर आहेत. कारवाई केल्यावर ते ठिकाण बदलून पुन्हा तोच धंदा सुरू करतात.

- डॉ. प्रशांत पाटील, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, कल्याण

--------------------------------

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार...

ॲलोपॅथीचे एकूण डॉक्टर - ९००

ॲलाेपॅथी व अन्य पॅथींच्या डॉक्टरांची संख्या - ३०००

बोगस डॉक्टरांची अंदाजित संख्या - ४०

कारवाई प्रवीष्ट बोगस डॉक्टरचे प्रकरण - १

फौजदारी गुन्हा दाखल केलेले प्रकरण - १

----------------------------------

Web Title: Munnabhai MBBS in the epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.