मुंब्रा अपघात: अभियंत्यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी; हलगर्जीपणाचा आरोप वकिलांनी फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:47 IST2025-11-08T10:47:04+5:302025-11-08T10:47:34+5:30
गर्दीमुळेच मुंब्रा येथील रेल्वे अपघात झाल्याचाही केला दावा

मुंब्रा अपघात: अभियंत्यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी; हलगर्जीपणाचा आरोप वकिलांनी फेटाळला
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंब्रारेल्वे अपघात प्रकरणातील समर यादव आणि विशाल डाेळस या दाेन अभियंत्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवार, ११ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा अहवाल आणि रेल्वे पाेलिसांचा अहवाल तपासून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही अभियंत्यांवरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मुंब्रा-दिवा या अप आणि डाऊन मार्गांवर ९ जून २०२५ राेजी झालेल्या अपघाताच्या वेळी कसारा ते सीएसएमटी अप आणि सीएमएमटी ते कर्जत या दाेन्ही उपनगरी रेल्वेतून नऊ प्रवासी खाली पडले हाेते. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले हाेते. या अपघाताची रेल्वेच्या दाेन अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा तब्बल पाच महिन्यांनी १ नाेव्हेंबर २०२५ राेजी दाखल झाला. अभियंत्यांनी देखभालीच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला. रूळ वेल्डिंग करणे अपेक्षित हाेते, तिथे पट्टी लावून बाेल्ट लावले, अशा तांत्रिक त्रुटी व्हीजेटीआयच्या अहवालात हाेत्या. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीमुळेच मुंब्र्यात अपघात
- पावसामुळे ट्रॅकखाली खडी वाहून गेली, अभियंत्यांनी रूळ वेल्डिंग करणे अपेक्षित हाेते, तिथे पट्टी लावून बाेल्ट लावले, हाच हलगर्जीपणा अपघाताचे कारण असल्याचे व्हीजेटीआयच्या अहवालात नमूद केले होते.
- गर्दी नियंत्रित ठेवणे हे पाेलिसांचे कर्तव्य असून, फूट बाेर्डवर उभे राहून प्रवास करणे गुन्हा असल्याचा मुद्दा आराेपींचे वकील बलदेवसिंग राजपूत यांनी मांडला. अपघातानंतर आणि आधी दिवसभरात सुमारे २०० रेल्वे गाड्या त्याच मार्गावरून गेल्या.
- हलगर्जीपणा झाला असता तर अन्य रेल्वेतील प्रवाशांनाही त्याचा फटका बसला असता. हा अपघात प्रवाशांच्या गर्दीमुळे झाल्याचा युक्तिवाद ॲड. राजपूत यांनी केला. रेल्वेचे काम सुरू राहण्यासाठी त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी ॲड. राजपूत यांनी केली.
‘निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंब्रा दुर्घटनेची चौकशी व्हावी’
मध्य रेल्वेवर ९ जून रोजी झालेल्या मुुंब्रा रेल्वे दुर्घटनेची पुढील चौकशी निष्पक्ष होण्यासाठी ती निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत व्हावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात येत आहे. यासंबंधित पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष लता अरगडे यांनी सांगितले. मुंब्रा दुर्घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याविरोधात रेल्वे कर्मचारी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी आंदोलन केले. परिणामी दोन प्रवाशांचा निष्पाप जीव गेला.
दरम्यान, प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटण्यास नकार देत विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याकडे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. मीना यांनाही दुर्घटनांची निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत चौकशीचे निवेदन दिल्याचे लता अरगडे यांनी सांगितले.