मुंब्य्रातील घटना: मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास पत्नीच्या खून प्रकरणातही अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 20:08 IST2018-01-28T19:51:28+5:302018-01-28T20:08:59+5:30
मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेख याला मुंब्रा पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. आता चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या पत्नीच्या खूनप्रकरणातही त्याला अटक करण्यात आली आहे.
_201707279.jpg)
मुंब्य्रातील घटना
ठाणे : स्वत:च्याच मुलीवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण-या नराधम पित्याला आता पत्नीच्या खूनप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात डोके आणि पाय नसलेल्या एका महिलेचे धड पोलिसांना मिळाले होते. याच खूनप्रकरणी पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ आणि पोलीस निरीक्षक आर.बी. वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्य्रातील कौसा भागातील शिवाजीनगर येथून महंमद अब्दुल्ला तजमुल शेख ऊर्फ बीरेंद्र सहा (५०, मूळ रा. बिहार) याला सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे, पोलीस हवालदार सुनिल गिरे, दत्ता गायकवाड आणि सुदाम पिसे आदींच्या पथकाने १६ जानेवारी रोजी अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत २२ जानेवारी रोजी संपल्यानंतर त्याला पत्नीच्या खून प्रकरणातही ताब्यात देण्याची मागणी पोलिसांनी ठाणे न्यायालयाकडे केली. त्यानंतर, त्याला २४ जानेवारी रोजी पुन्हा न्यायालयातून अटक करण्यात आली. पहिली पत्नी आवडत नसल्याने तिच्यापासून विभक्त होऊन अनेक विवाह करता यावेत, म्हणून त्याने तिच्यासह स्वत:चेही धर्मांतर केले. त्यानंतर, तिच्याशी विभक्त न होताच तीन लग्न केली. दुसरी आणि तिसरीला ‘तलाक’ देऊन चौथ्या तबस्सुम या पत्नीचा मात्र २२ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने खून केला. पोलिसांनी त्याच्या पहिल्या पत्नीकडील चौकशीत त्याला मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर, आता पत्नीच्या खून प्रकरणात अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी त्याने पत्नीचे शिर धडावेगळे करून तिची खंजीरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. त्यावेळी मुंब्रा बायपासजवळ केवळ तिचे धड पोलिसांना एका प्लास्टिकच्या गोणीत मिळाले होते. आता हत्या करण्यासाठी त्याने वापरलेला खंजीर आणि तिचे शिर जिथे लपवले, त्या ठिकाणाचाही पुन्हा पंचनामा केला जाणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. त्यामुळे चार वर्षांनंतर या खून प्रकरणाचा नव्याने पुन्हा तपास करण्यात येत असल्याचे निरीक्षक वळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.