मुंबईचे पाणी ठाण्याला
By Admin | Updated: March 20, 2016 00:56 IST2016-03-20T00:56:22+5:302016-03-20T00:56:22+5:30
भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले

मुंबईचे पाणी ठाण्याला
ठाणे : भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले आहे आणि त्याबदल्यात ठाण्याच्या वाट्याचे टेमघरचे पाणी कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला देत पाणीवाटपाचे फेरनियोजन केले आहे. यामुळे मुंबईला फारसा फटका बसणार नसला तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला थोडे जादा पाणी देत दिलासा दिला आहे.
ठाणे महापालिकेला भातसा धरणातून लागू केलेली ३० टक्के पाणीकपात मुख्यमंत्र्यांनी अवघी पाच टक्के केली आहे. यामुळे ठाण्याला आता भातसातून १४० ऐवजी १५० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या बदल्यात ठाण्याला मिळणारे टेमघरचे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर महापालिकांना वळवण्यात आले आहे.
भातसातून ठाणे महापालिकेला २०० एमएलडी पाणी मिळत असे. यातून मुंबई महापालिकेने ३० टक्के कपात लागू केली होती. ती केवळ पाच टक्के होणार आहे. उरलेले २५ टक्के पाणी पुन्हा ठाण्याला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यामुळे ठाणेकरांना आता भातसातून रोज १० एमएलडी जादा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यात ठाण्याला टेमघरकडून मिळणारे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर यांना समान वाटण्याचा निर्णय घेतल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सुभाष वाघमारे यांनी सांगितले.
प्रक्षोभ शमवण्यासाठी उचलली पावले
पाणीकपातीमुळे ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात प्रक्षोभ आहे. त्यावर तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही महत्त्वाच्या आमदारांची बैठक घेऊन पाणीकपात कमी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौरांनी सर्वाधिक पाणी आपल्या शहराकडे वळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.