नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

By अनिकेत घमंडी | Updated: June 12, 2025 08:12 IST2025-06-12T08:12:01+5:302025-06-12T08:12:14+5:30

Mumbai Suburban Railway: मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

Mumbai Suburban Railway: As the railways get involved in building new stations, | नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

-अनिकेत घमंडी
डोंबिवली - ठाणे जिल्ह्यात नवीन ठाणे, चिखलोली, मानस मंदिर, दातीवली, पारसिक यांसह मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

चिखलोली स्थानक सात वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्याला निधी मिळून बांधकामही सुरू आहे. नवीन ठाणे स्थानकाचे तेच रडगाणे आहे. दिवा-कोपर मार्गावर दातीवली, बदलापूरजवळ समर्थवाडी स्थानकाचा प्रस्ताव तसाच आहे. आसनगावजवळ मानस मंदिराचा विषयही तसाच. जिल्ह्यात झपाट्याने नागरीकरण वाढल्याने कल्याणच्या पुढे वांगणी, शेलू, नेरळपर्यंत आणि टिटवाळा, खडवली, आसनगाव, वासिंद परिसरात नागरिक घरांना पसंती देत आहेत. त्यामुळे तेथे नव्याने रेल्वेस्थानक होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गुरवलीच्या मागणीचे ५० वर्षे भिजत घोंगडे आहे.

फेऱ्या वाढवा
गर्दीच्या विभाजनासाठी लोकल फेऱ्या वाढवणे त्यासोबतच नव्याने रेल्वे स्थानकांची निर्मिती गरजेची आहे. चिखलोली स्थानक झाल्यास अंबरनाथ स्थानकाचा भार कमी होईल, मानस मंदिर झाल्यास आसनगाव, वासिंद आणि दातीवली झाल्यास दिव्याचा भार कमी होईल.

नवे ठाणे स्थानक झाल्यावर सध्याच्या ठाणे स्थानकातील होणारी गर्दी कमी होईल. तेथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्यास ठाणे स्थानकाला मोकळा श्वास घेता येईल. प्रस्तावित पारसिक स्टेशन झाल्यास मुंब्रा, कळवा स्थानकातील गर्दीचे विभाजन होईल; परंतु नव्या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत. 

दातीवली स्थानकाची मागणी १९८० पासून, तर  गुरवलीची मागणी १९६५ पासून प्रलंबित आहे. बदलापूर-वांगणी मार्गावर समर्थवाडी स्थानक प्रस्तावित आहे. प्रवाशांची मागणी असल्याने रेल्वेने सर्व्हे करावे व त्यांना मंजुरी द्यावी.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष,
ठाणे रेल्वे प्रवासी संस्था.

अंबरनाथजवळ असलेल्या चिखलोली स्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. हे स्थानक झाल्यास बदलापूर, अंबरनाथ स्थानकांतील गर्दीवर निश्चित परिणाम होईल. प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन झाले, तरच सध्याच्या स्थानकात आणखी सुविधा देण्याकडेही लक्ष देता येईल. नव्याने स्थानके होणे गरजेचे आहे. 
- अनुप मेहेत्रे,  दक्ष प्रवासी, अंबरनाथ 

Web Title: Mumbai Suburban Railway: As the railways get involved in building new stations,