हाय हिल्समुळे गेला आईचा तोल, सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 15:52 IST2018-05-07T15:52:49+5:302018-05-07T15:52:49+5:30
आईचं उंच टाचांच्या चपला घालणं एका सहा महिन्याच्या बाळाच्या जीवावर बेतलं आहे.

हाय हिल्समुळे गेला आईचा तोल, सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू
कल्याण- आईचं उंच टाचांच्या चपला घालणं एका सहा महिन्याच्या बाळाच्या जीवावर बेतलं आहे. उंच टाचांच्या चपलांमुळे आईचा तोल गेला व तिच्या कडेवर असलेलं सहा महिन्याचं बाळ निसटल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून लग्नाच्या हॉलमध्ये ही घटना घडली.
फेमिदा शेख असं या २३ वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला उल्हासनगरच्या धोबीघाट येथे राहणारी असून रविवारी या महिलेचं संपूर्ण कुटुंब कल्याणमधील रामबागेत असणाऱ्या मातोश्री हॉलमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलं होतं. लग्न सोहळा आटपून हॉलमधून बाहेर पडताना हाय हिल्स चप्पलमुळे या महिलेचा तोल गेला आणि तिच्या कडेवरून तिचा सहा महिन्याचा मुलगा निसटला. कडेवरून निसटलेला मुलगा थेट पहिल्या मजल्यावर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. शेख कुटुंबीयांनी मुलाला तात्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. मोहम्मद शेख असं मुलाचं नाव आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार उल्हासनगरमध्ये राहणारं शेख कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. बाळाचे वडील एका दुकानात काम करतात तर आई गृहीणी आहे.