आईनेच दिले चोरीचे ‘बाळकडू’; संपूर्ण कुटुंबच चोरीमध्ये गुंतल्याची धक्कादायक माहिती उघड
By जितेंद्र कालेकर | Updated: July 31, 2025 10:03 IST2025-07-31T10:02:49+5:302025-07-31T10:03:34+5:30
११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या पडताळणीतून या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली.

आईनेच दिले चोरीचे ‘बाळकडू’; संपूर्ण कुटुंबच चोरीमध्ये गुंतल्याची धक्कादायक माहिती उघड
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : नौपाडा येथील घरफोडीचा तपास करताना संपूर्ण कुटुंबच चोरीमध्ये गुंतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. पूजा गुप्ता ऊर्फ पूजा प्रकाश आव्हाड (वय ४५) हीच गुन्ह्याची मुख्य सूत्रधार असून, तिचा पती, बहीण आणि मुलेही चोरीचा ‘उद्योग’ करीत असल्याचे आढळले. गणेश गुप्ता ऊर्फ गणेश आव्हाड (२०) या तिच्या मुलाला अटक केली. चाैकशीत आईकडून त्याला चाेरीचे बाळकडू मिळाल्याचे समाेर आले.
११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या पडताळणीतून या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली. एका लहान मुलीच्या पाठीवरील बॅगेतून घरफोडीची सामग्री काढताना आढळल्यानंतर पोलिसांनी दिवा परिसरात पाळत ठेवून गणेशला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील १० लाख ९९ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला. त्याने आतापर्यंत केलेल्या चोरीच्या १० गुन्ह्यांची कबुलीही दिली.
ठाण्यातील अतुल मराठे यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सात लाख ९९ हजारांचा ऐवज १४ जुलैला चोरीला गेला होता. सहायक आयुक्त प्रिया ढाकणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने अनेक सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली.
मुलीच्या दप्तरात हत्यारे
पूजाच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला. दुसरा पती आणि बहीणही चोरी करण्यात माहीर. पूजाला पाच वर्षांची मुलगी, सात, १७ आणि २० वर्षांची तीन मुले. या तिघांचाही ती चोऱ्यांसाठी खुबीने वापर करून घेते. मुलीच्या दप्तरामध्ये ती चोरीची सामग्री ठेवत असे.
पूजाची मात्र हुलकावणी
सूत्रधार पूजाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करणे किंवा स्वत:वरच दगडाने हल्ला करून घेणे तसेच स्वत:चे कपडे फाडणे, असे प्रकारही करून ती पोलिसांना गुंगारा देत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भांगे यांनी सांगितले.