४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 06:37 IST2024-11-29T06:36:42+5:302024-11-29T06:37:10+5:30

मनोरुग्णालयाच्या प्रयत्नांना आले यश, वयाच्या ५४ व्या वर्षी ही महिला २०२० मध्ये हरवली. तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पूर्व पोलिस स्थानकात हरवल्याचा गुन्हा १६ एप्रिल २०२० रोजी नोंदवला.

Mother admitted to Thane regional psychiatric hospital meets her son after 4 years | ४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला

४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला

ठाणे - ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून गेलेला फोन खणखणला... तुमची आई आमच्याकडे आहे आणि ती बरी झालेली आहे... हे शब्द कानावर पडताच आई जिवंत आहे यावर सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नव्हता...त्याने व्हिडीओ कॉलवर आईला पाहिले आणि तिच्या लेकराची उत्कंठा शिगेला पोहोचली. 
अक्षरश: धावत पळत आपल्या आईला घ्यायला तो मनोरुग्णालयात पोहोचला. आपल्या आईला पाहून तो ढसढसा रडू लागला. आईनेदेखील आपल्या पोटच्या पोराला ओळखले. चार वर्षांनंतर हरवलेल्या आईची आपल्या लेकरासोबत भेट झाली. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या आईची घरवापसी गुरुवारी झाली. 

वयाच्या ५४ व्या वर्षी ही महिला २०२० मध्ये हरवली. तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पूर्व पोलिस स्थानकात हरवल्याचा गुन्हा १६ एप्रिल २०२० रोजी नोंदवला. भरकटलेल्या अवस्थेत ती काही दिवसांनी वालीव पोलिस स्टेशन परिसरात सापडली.  त्यांनी वसई विरार मनपा बहुउद्देशीय निवारा संस्थेत महिलेस दाखल केले. तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे लक्षात आल्यावर २७ सप्टेंबर २०२४ रोजी तिला ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. 
तिला विस्मरणाचा त्रास होत असल्याचे लक्षात आले. मनोरुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी तिला उपचार देऊन बरे केले.

असा घेतला मुलाचा शोध... 
समाजसेवा अधीक्षका नितीन शिवदे यांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. तिने वाळवा तालुका, जिल्हा सांगली असे सांगितले. तिथे चौकशी केले असता हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात आले. नंतर तिने भांडूप सांगितले. मग शिवदे यांनी भांडूपमधील सर्व चाळींची नावे शोधून काढली. ती एकेक खुण सांगायला लागली. तिने ती साईनगरची असल्याचे सांगितले. तेथे चौकशी केल्यावर ती चाळ पुनर्विकासासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मुलांची नावे मात्र तिला आठवत नव्हती. वेगवेगळी नावे घेतल्यावर तिने मुलाचे नाव ओळखले. मग त्या नावावरून मुलाचा फेसबुकवर शोध घेतला. 

आईला शेवटपर्यंत सांभाळणार
आईला शेवटपर्यंत सांभाळणार आहे. तिचा खूप शोध घेतला. तिचा शोध लागत नसल्याने निराशा झालो; पण पत्नी सारखी म्हणत होती आई पुन्हा येतील आणि तेच झाले, असे मुलाने सांगितले. डॉ. मुळीक यांनी पुढे आईची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन तिच्या मुलाला केले.

Web Title: Mother admitted to Thane regional psychiatric hospital meets her son after 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.