मोरीवली, वडवली गावाला प्रदूषणाचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:04 IST2020-09-30T00:03:34+5:302020-09-30T00:04:01+5:30

नागरिक त्रस्त : चुकीच्या पद्धतीने सोडतात विषारी वायू

Moriwali, Vadavalli village at increased risk of pollution | मोरीवली, वडवली गावाला प्रदूषणाचा वाढता धोका

मोरीवली, वडवली गावाला प्रदूषणाचा वाढता धोका

अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरीवली आणि वडवली या दोन केमिकल झोनमध्ये आता कारखानदार चुकीच्या पद्धतीने रासायनिक वायू हवेत सोडत आहेत. या रासायनिक प्रदूषणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. रोज विषारी धूर आणि वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी मांडली आहे.

गेल्या महिन्यात वडवली गावातील केमिकल झोनमधील एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर सोडण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ भागातील साई, कानसई, स्वामीनगर आणि वडवली गाव परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा असताना आता नव्याने घातक आणि त्रासदायक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. मोरीवली परिसरातील काही कारखानदार चुकीच्या पद्धतीने थेट हवेत वायू सोडत असल्याची बाब ग्रामस्थांनी समोर आणली आहे. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडण्याचे प्रमाण वाढल्याने आता या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. हीच परिस्थिती वडवली भागातही झाली आहे. मात्र त्या ठिकाणीही नागरिकांच्या तक्रारींना बगल देण्याचे काम केले जात आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य असते.

Web Title: Moriwali, Vadavalli village at increased risk of pollution