MNS's Konkan bus service in front of tmc | ठामपासमोरून मनसेची कोकण बससेवा; पानसे यांची सरकारवर टीका

ठामपासमोरून मनसेची कोकण बससेवा; पानसे यांची सरकारवर टीका

ठाणे : मनसेने शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सोमवारी रात्री गणेशोत्सवानिमित्त कोकणच्या चाकरमान्यांसाठी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरून मोफत बस सेवेचा शुभारंभ केला. या वेळी मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून लाखो परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडायला ठाकरे सरकार व्यवस्था करू शकते; मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था करायला सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका केली. तर सरकार जिथे कमी तिथे मनसे उभी राहते, असे पक्षाचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.

सोमवारी २६, तर मंगळवारी १९ बस कोकणसाठी सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिका मुख्यालयातून अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती. याच कारणास्तव मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नाकावर टिच्चून ठामपा मुख्यालयासमोरूनच या बस सोडल्या.

खा. विनायक राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही, कोकणवासी सुखरूप गावी पोहोचणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मनसेने दिलेला शब्द पाळला. जाताना प्रवाशांचे तापमान आणि आॅक्सिजनपातळी तपासल्याचे जाधव म्हणाले. तर, पानसे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, एसटीची व्यवस्था सरकारने केली नाही, रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यामुळे नक्की सरकार कोणाचे? याचा कोकणवासीयांनी विचार करावा. या वेळी शहर सचिव नैनेश पाटणकर, महेश कदम, रवी सोनार व इतर मनसैनिक उपस्थित होते.

‘...तरीही थांबणार नाही’
सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना जबाबदारी टाळायची आहे म्हणून ते कोकणात येऊ नका, असे सांगतात. जेव्हा मराठी सणांवर आपत्ती येते तेव्हा मनसेच उभी राहते. खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही, असेही पानसे म्हणाले.

Web Title: MNS's Konkan bus service in front of tmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.