वाढीव वीजबिलाच्या विरोधात मनसेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:17 IST2020-07-27T16:17:27+5:302020-07-27T16:17:31+5:30
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी केली.

वाढीव वीजबिलाच्या विरोधात मनसेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे
ठाणे : कोरोनाच्या काळात हाताला काम नसताना देखील नागरिकांना वाढीव वीजबिल मिळाली आहेत. एकीकडे बेरोजगारी वाढली असताना दुसरीकडे वाढीव वीजबिल आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेच्या वतीने लोकमान्य नगर येथील महावितरण कार्यालयावर कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी केली.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची सर्वसामान्य जनता ही गेल्या ४ महिन्यांपासून घराबाहेर पडू शकली नाही. यामुळे अनेक जणांना वर्कफ्रॉम होम करावा लागला, तर कित्येक जण बेरोजगार देखील झाले. बेरोजगारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. राज्य सरकारने या नैसर्गिक आपत्ती काळात जनतेला कोणत्याही प्रकारे आर्थिक दिलासा दिला नाही. या संकटकाळातच महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळाने सर्वसामान्य वीज ग्राहकानेच वीज मीटर वाचन (रीडिंग) न घेता सरासरी वीज देयक पाठवून दिलीत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना वाढीव वीजबिल देण्यात आली आहेत. ज्यामध्ये वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे, सौरभ नाईक, निलेश चौधरी, राजेंद्र कांबळे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.