उल्हासनगर स्कायवॉकसाठी मनसेचे एमएमआरडीएकडे साकडॆ, दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 15:44 IST2021-09-18T15:43:13+5:302021-09-18T15:44:09+5:30
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला आहे. मात्र स्कायवॉकचे नियमित व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने, स्कायवॉकची दुरावस्था होऊन नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोरांचा अड्डा झाला.

उल्हासनगर स्कायवॉकसाठी मनसेचे एमएमआरडीएकडे साकडॆ, दुरुस्तीची मागणी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : स्टेशनच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरावस्था होऊन गर्दुल्ले, भुरटे चोर, नशेखोर आदींच्या पासून स्कायवॉक मुक्त करण्याचे साकडे एमएमआरडीएचे अभियंता पी जे भांगरे यांच्याकडे मनसेने घातले. वादग्रस्त व गुन्हेगारांचा अड्डा झालेल्या स्कायवॉक बाबत निर्णय घेण्याची मागणी मनसेने करून आंदोलनाचा इशारा दिला.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला आहे. मात्र स्कायवॉकचे नियमित व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने, स्कायवॉकची दुरावस्था होऊन नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोरांचा अड्डा झाला. गेल्या आठवड्यात वर्दळीच्या वेळी रात्रीचे ९ वाजता स्कायवॉकवर उभ्या असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला जिवेठार मारण्याची धमकी देऊन, एक तरुणाने रेल्वेच्या बंद कॉटर्स मध्ये नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार घडल्याने, एकच खळबळ उडाली. दरम्यान स्कायवॉकचे हस्तांतर महापालिकेकडे कारण्याच्या मागणीने जोर पकडला असून मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता पी.जे.भांगरे यांची भेट घेतली. उल्हासनगर स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्ती, सुरक्षा, तसेच हस्तांतरणा बाबत यावेळी चर्चा झाली.
रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूच्या स्कायवॉकची दुरावस्था झाली असून स्कायवॉक वरील पत्रे, लोखंडी पाईप आदी साहित्याची चोरीला गेली. सफसफाईचे तीनतेरा वाजल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून लाईट बंद असल्याने, चोऱ्या, नागरिकांना लुटणे, मारहाण आदी प्रकार सर्रासपणे होत असल्याची माहिती मनसेचे बंडू देशमुख यांनी एमएमआरडीएचे अभियंता पी जे भांगरे यांना दिली. तसेच स्कायवॉकचे हस्तांतर पालिकेकडे झाल्यास, स्कायवॉकची साफसफाई व निघा राखून गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अभियंत्याने स्कायवॉक बाबत वेळीच निर्णय न घेतल्यास, एमएमआरडीए आयुक्तांकडे साकडे घालून आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला. शिष्टमंडळा मध्ये शालिग्राम सोणवने, मुकेश सेठपलानी, तन्मेश तन्मेश देशमुख आदींचा समावेश होता.