ठाणे/मुंबई : गेल्या २० ते ३० वर्षांत मुंबईतून मराठी माणसांचे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने येथील मराठी मतदारांचा टक्का मजबूत असल्याने राष्ट्रीय पक्ष भाजप व मनसेसारख्या मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या पक्षासह भिवंडीत समाजवादी पार्टी आणि उल्हासनगरातील ओमी कलानी यांच्या पक्षानेही मराठी उमेदवार लक्षणीय संख्येने रिंगणात उतरवले. अन्य पक्षांनी ७० ते ९० टक्के मराठी उमेदवारांना तिकिटे दिली. मुंबईतही अनेक पक्षांनी मराठी उमेदवार मोठ्या प्रमाणात दिले आहेत. भाजपने ठाण्यात ४० पैकी ३० मराठी उमेदवार दिले आहेत. उर्वरित उमेदवारांमध्ये पाच मुस्लीम, दोन उत्तर भारतीय, एक गुजराती, पंजाबी आणि दाक्षिणात्य भाषिकांचा समावेश आहे. ठाण्यात मनसेने २७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनी सर्वच ठिकाणी मराठी उमेदवार दिले. ठाण्यात शिंदेसेनेच्या ७९ उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून त्यात केवळ एक उत्तर भारतीय, एक शीख आणि एक सिंधी उमेदवाराचा समावेश आहे. उर्वरित सर्व ७६ उमेदवार मराठी आहेत. उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी अजून अधिकृतपणे उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नाहीत.
मुंबईत सर्वच पक्षांनी दिले मराठी उमेदवारमुंबईत २२७ प्रभागापैकी १३८ प्रभागात मराठी मतदारांचे प्राबल्य आहे. त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजप, उद्धवसेना, मनसे, शिंदेसेना, काँग्रेससारख्या पक्षांनी मोठ्या प्रमाणात मराठी उमेदवार दिले. तर राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार), समाजवादी, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनीही मराठी उमेदवार देऊन या मतदारांना खेचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने १३७ पैकी ९२ उमेदवार मराठी दिले आहेत. काँग्रेसने ६३, मनसे ४९, राष्ट्रवादीने (अजित पवार) ६५, राष्ट्रवादी (शरद पवार)ने ९, समाजवादी पक्षाने १२, तर वंचित बहुजन आघाडीने ३६ मराठी उमेदवार दिले आहे. तर, उद्धवसेना, शिंदेसेनेने अधिकृत याद्या जाहीर केल्या नाहीत.
उल्हासनगरात काय स्थिती?उल्हासनगर महापालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला असून ७८ उमेदवारांपैकी ३८ मराठी, २८ सिंधी, १० उत्तर भारतीय आणि दोन शीख उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपखेरीज अन्य कुठल्याही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र, मनसेने दिलेले सर्व उमेदवार मराठी आहेत. शिंदेसेनेनेही ९० टक्के उमेदवार मराठी दिले आहेत. ओमी कलानी यांचे ५० टक्के उमेदवार मराठी आहेत. साई पक्षाने जास्तीतजास्त सिंधी उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे.
कल्याण-डोंबिवलीत काय? भाजपने दिले ५१ उमेदवारकल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने ५४ जणांची उमेदवारी जाहीर केली. त्यांपैकी ५१ उमेदवार मराठी असून अन्य तीन जणांमध्ये दोन उत्तर भारतीय आणि एका गुजराती उमेदवाराला संधी दिली आहे. मराठी उमेदवारांमध्ये आगरी-कोळी, ब्राह्मण, मालवणी, मराठा असे उमेदवार आहेत. भाजपने २८ महिलांना, तर २६ पुरुषांना उमेदवारी दिली. महापालिका हद्दीत मराठी टक्का सर्वाधिक असून त्या खालोखाल गुजराती, जैन, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय समाजाचे वास्तव्य आहे. मनसेने ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली. तीत सर्व उमेदवार मराठी भाषिक आहेत. शिंदेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही.
भिवंडीतील उमेदवारीचे चित्र कसेमुस्लीमबहुल भिवंडीत भाजप आणि शिंदेसेनेने युती केली असून भाजपने ३०, तर शिंदेसेनेने २० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. तीत ३० पैकी २१ उमेदवार मराठी असून प्रभाग क्र. १६ मध्ये केवळ एक जागा उत्तर भारतीय उमेदवाराला दिली. जैन, मारवाडी आणि गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने तीन जणांना उमेदवारी दिली आहे. चार तेलगू भाषिकांना संधी दिली. एका जागेवर मुस्लीम उमेदवार दिला आहे. उत्तर भारतीयांना केवळ एक जागा दिल्याबद्दल उत्तर भारतीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मनसेने ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून सर्व मराठी आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ३३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांत ११ मराठी, १४ मुस्लीम, दोन उत्तर भारतीय, एक गुजराती, पाच दक्षिण भारतीय आहेत. समाजवादी पक्षाचे ६१ उमेदवार असून मुस्लीम ४७, मराठी १२, दक्षिण भारतीय एक व उत्तर भारतीय एक आहेत. शिंदेसेनेने २० उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनीही यादी जाहीर केली नाही.
Web Summary : Thane sees Marathi candidates prioritized by MNS, BJP, and Shinde Sena. Mumbai witnesses all parties fielding Marathi candidates in Marathi-dominated areas. Ulhasnagar and Bhiwandi also show a preference for Marathi candidates, with varying representation from other communities.
Web Summary : ठाणे में मनसे, भाजपा और शिंदे सेना द्वारा मराठी उम्मीदवारों को प्राथमिकता। मुंबई में सभी पार्टियाँ मराठी-प्रधान क्षेत्रों में मराठी उम्मीदवार उतार रही हैं। उल्हासनगर और भिवंडी में भी मराठी उम्मीदवारों को प्राथमिकता दिख रही है, अन्य समुदायों का प्रतिनिधित्व भिन्न है।