ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजप वाद सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 00:26 IST2019-05-13T00:25:49+5:302019-05-13T00:26:37+5:30
आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मनसे - भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे.

ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजप वाद सुरूच
ठाणे : आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मनसे - भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. एका मराठी शेतकऱ्याला विरोध करणारा भाजप हा त्याच ठिकाणी फुटपाथवर असलेल्या परप्रांतीय आंबे विक्रेत्याला विरोध का करीत नाही, असा सवाल मनसेने रविवारी फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओद्वारे केला आहे.
आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजपमध्ये गुरूवारी जोरदार हाणामारी झाली आणि त्यानंतर सोशल मीडियावर या वादाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली. मनसे - भाजपचे कार्यकर्ते फेसबुकवर एकमेकांना शिवीगाळ देण्यापर्यंत उतरले आहेत. रस्त्यावरचा वाद हा आता सोशल मीडियावरही गाजत आहे. यातच रविवारी ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपविरोधात फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडीओ टाकला आहे.
मराठी शेतक-याचा आंब्याचा स्टॉल भाजपचे नगरसेवक हटवितात, तिथूनच दोन मिनिटांच्या अंतरावर असलेला परप्रांतीय आंबे विक्रेत्याचा स्टॉल भाजपला दिसत नाही का, असा सवाल जाधव यांनी केला आहे.
मराठी शेतकºयास त्रास
अनेक दिवसांपासून परप्रांतिय विक्रेता आंबे विकत आहे. परंतू मराठी शेतकरी आंब्याची विक्री करीत असेल, तर त्याला भाजपचे नगरसेवक त्रास देतात. फुटपाथ मोकळा हवा असेल, तर त्या परप्रांतीय विक्रेत्यालाही हटवा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.